Bookstruck

मोहनगाव 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तू माझे हृदय जिंकले आहेस. सेवेने, त्यागाने, कष्टाने. मी कीव नाही केली. मी सखारामजवळ काल रात्री बोलत होतो. त्याची संमती आहे. यंदा वसाहतीचा दुसरा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्या वसाहतीचे मोहनगाव म्हणून नाव ठेवायचे आहे. ह्या समारंभाच्या वेळेस आपण विवाहबद्ध होऊ. चालेल ना?”

“मी युगानुयुगेही वाट पाहीन.”

“मी जाऊ?”

“काम असेल तर जा.”

घना तिच्याकडे प्रेमाने बघून गेला. त्याने दिलेली माळ तिने गळ्यात घातली, हृदयाशी धरली. ती नाचू-गाऊ लागली, ती मुलांत मिसळली. तीही पारंब्या धरून वर चढली. तिने झोके घेतले. जणू तिचे हृदय अमित आनंदलहरींवर नाचत होते.

वसाहतीच्या नामकरणाचा समारंभ थाटाने व्हायचा होता. अधिक धान्य पिकवा मोहिमेत या प्रयोगाला बक्षीस मिळले. तेथे केवळ धान्यच नव्हते पिकत, तर नव-मानवता पिकत होती. पंडित जवाहरलाल नेहरू तेथे येणार होते. परंतु त्यांचा अमेरिकेचा दौरा निघाल्यामुळे त्यांनी शुभेच्छा पाठवल्या.

जयप्रकाश येतील का? घनाने त्यांना पत्र पाठवले.  त्यांनी यायचे कबूल केले. सर्वांना आनंद झाला. तीन दिवसांचा कार्यक्रम होता. नाटक, खेळ, वनभोजन, -- नाना प्रकार होते. घनाच्या ज्या नाटकाला बक्षीस मिळाले होते, -- “खरा प्रयोग अर्थात खरी संस्कृती” हे नाटक करण्याचे ठरले. नाटकाच्या तालमी होऊ लागल्या. मंडप-उभारणीचे काम सुरू झाले. एकाने पडदे रंगवले. त्यांच्यात नाना कलावंत होते, नाना कसबी लोक होते.

सखारामचा भाऊही घरदार विकून या वसाहतीत रहायला आला. दादा, वैनी, जयंता, पारवी यांना पाहून मालती आनंदली.

“आते, तुझे लग्न?” पारवी हसून विचारी.

“होय बाळ.” मालती तिचा पापा घेऊन म्हणे.

“माझ्या भावलाभावलीचेही त्याच वेळेस लावू, चालेल?”

“हो, चालेल.”

« PreviousChapter ListNext »