Bookstruck

१४ पावस २

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पावस हे धड शहर नाही धड खेडे नाही अशा स्वरूपाचे अर्ध शहरी गाव होते.डोरल्याच्या मानाने हे बरेच मोठे होते .मुख्य रस्ता गावातून गेलेला असल्यामुळे याला रत्नागिरी पूर्णगड लांजे याला कनेक्टिव्हिटी चांगली  होती लांजे हे गाव मुंबई गोवा हायवेवर होते या गावाला मोठी बाजारपेठही होती .समुद्र मार्गे भरतीच्या वेळी मोठी जहाजे खाडीतून येऊन दुकानांच्या पाठीमागे लागत असत त्यामुळे मुंबईहून  माल आणता येई.या सर्व नदीकाठच्या दुकानांना म्हणजेच बाजारपेठेला फड अशी संज्ञा  होती.मुंबईच्या मोठ्या बाजारपेठेमधून माल आल्यामुळे तो स्वस्तही पडत असे.   या गावात मुस्लिमांची वस्तीही बर्‍यापैकी होत. काजीवाडा भुसारवाडा अश्या मुस्लिमांच्या वस्त्या होत्या. काजीवाडा म्हणजे मुस्लिमातील ब्राह्मण व भुसारवाडा  म्हणजे मुस्लिमांतील वाणी होय .ब्राह्मण वाणी कुणबी खारवी अश्याही वस्त्या  होत्या.हल्ली प्रमाणेच पण कमी प्रमाणात कुणीही कोणताही व्यवसाय करीत असे  .मी रत्नागिरीला शिक्षणासाठी असल्यामुळे गावात विशेष नसे फक्त सुट्टीचा येत असे . येथे फक्त दोन तीन वर्षेच आम्ही असल्यामुळे  मी गावाशी एकरुप होऊ शकलो नाही.

आंम्ही अप्पांच्या घरी राहावयाला आलो.अप्पाही त्यांच्या घरी मधूनमधून राहायला येत असत त्यामुळे त्यांच्या सहवासाचा आम्हाला लाभ झाला.माझा धाकटा भाऊ राजा बंगल्यांमधून प्राथमिक शाळेत जात असे तो आता या घरातून शाळेत जाऊ लागला. प्राथमिक शाळा येथून बंगल्यापेक्षा जवळ होती परंतु अड्डा जिथून मोटारी सुटत तो लांब असल्यामुळे मला बरेच चालावे लागे. पूर्वीसारखे रस्त्यावरच मोटर पकडता येत नसे.अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नात चरितार्थ भागणे शक्य नसल्यामुळे भाऊनी आंब्याचा व्यवसाय सुरू केला.

गुळ्याला आमची आंब्याची बाग होती त्यातील आंबे चोरीला जात असत व नुकसान होई.गुळ्याला आम्हाी असलो तर बागेची देखभाल व्यवस्थित होईल व आंबे चोरीलाही जाणार नाहीत यासाठी भाऊंची घालमेल होत आहे असे अप्पांच्या लक्षात आले व त्यांनी आपणहून आम्हाला घरी गेलात तरी चालेल असे सांगितले .ते म्हणाले मी आईची काही अन्य व्यवस्था करीन. भाऊंना अप्पांना गुळ्याला जाऊ हे कसे विचारू याबद्दल जो संकोच वाटत  होता तो दूर झाला याबाबतीत अप्पांची एक आठवण सांगण्यासारखी आहे.बऱ्याच वेळा मनात काही शंका घेऊन काही लोक त्यांना भेटायला येत त्यावेळी त्यांना आलेल्याची समस्या कळे व ते पटकन एखादे पुस्तक काढून त्यातील काही भाग त्याला वाचण्यासाठी देत व आलेल्या माणसाची शंका दूर होई.किंवा एखाद्याने प्रश्न विचारल्यावर  एखादे पुस्तक काढून त्यातील काही पाने त्याला वाचण्यासाठी देत व त्याची शंका दूर होत असे .यामध्ये त्यांची तीव्र स्मरणशक्ती व संवेदनशीलता लक्षात येते .                      अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी गुळ्याला आलो .रत्नागिरीला जाताना पावस वरून मोटारीने जावे लागे त्याचप्रमाणे  आतेकडे जाताना पावसवरून जावे लागे. आता जिथे स्वामी स्वरूपानंदांचे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी खालच्या बाजूला स्वामींचे मूळ घर जसेच्या तसे जतन करून ठेवलेले आहे .त्या घरात आम्ही दोन तीन वर्षे राहत होतो त्यावेळी आम्हाला ते अप्पाच होते नंतर पुढे ते स्वामी स्वरूपानंद म्हणून प्रसिद्ध झाले .आणखी एक माझी आठवण सांगण्यासारखी आहे .भाऊ मला म्हणत की तुझ्या आसपास सर्वत्र अध्यात्मिक मंडळी आहेत तरीही तुला काही करावेसे वाटत नाही .मी भाऊना म्हणे येता जाता अप्पांच्या पाया पडतो लोखंडाची कितीही इच्छा नसली  तरी परिस स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने हे होणारच थोडेसे विनोदाने थोडेसे गंभीरपणे मी असे म्हणत असै.

२९/५/२०१८  ©प्रभाकर पटवर्धन 
pvpdada@gmail.com

« PreviousChapter ListNext »