Bookstruck

१५ पोत एक अजब उपचार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

माझ्या लहानपणी म्हणजे सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी पोत घेतलेले लोक दिसत असत .थट्टेने त्यांना पोतकर असे म्हणत.ज्यांच्या घराण्यात पिढय़ान् पिढय़ा पोत घेण्याची परंपरा होती त्यांना पोतकर असे म्हणत की काय ते माहीत नाही!! . पोतकर आडनावाच्या व्यक्तींनी वैषम्य मानून घेऊ नये .माझे वडीलही त्यातीलच एक होते! फक्त पिढ्यान पिढ्या कुणी पोत घेतलेला नसल्यामुळे आम्ही पोतकर नाही, पटवर्धन अाहोत. .देव किंवा देवीच्या देवळांमध्ये पालखीजवळ जी मशाल असते तिलाही पोत असे म्हणतात .ती धरण्याचा ज्यांना मान असतो ते पोतकर असेही म्हटले जाते.पोत नावाच्या गावाचे रहिवासी ते पोतकर असेही म्हणता येईल .गडावर किंवा अन्यत्र आदरणीय व्यक्तींना रस्ता दिसावा यासाठी मशाल/ पोत घेऊन जे लोक असत त्यांनाही पोतकर म्हणता येईल .

माझ्या लहानपणी पोत घेतलेले लोक दिसत, असा मी सुरुवातीला उल्लेख केला आहे तो पोत, म्हणजे देव, देवी ,किंवा रस्ता दाखवण्यासाठी मशाल घेऊन पुढे चालणारे ,किंवा पोत गावचे रहिवासी ,लोक नव्हेत .

हा पोत म्हणजे साधारणपणे ढोपराच्या खाली ,परंतु काही वेळा मांडीवर, मुद्दाम विशिष्ट पद्धतीने केलेली जखम ,त्यात ठेवलेली रुईच्या पाळाची वाटाण्याएवढी गोळी व त्यावर बांधलेली पट्टी होय .ही जखम एखाद्या रोगातून बरे होण्यासाठी म्हणून केलेली असे. हा पोत एखाद्या रोगापासून मुक्त होण्यासाठी घेतलेला असे .

अशी जखम करण्यामागील शास्त्र पुढील प्रमाणे होते .

नेहमी आपल्या उत्सर्जनेद्रियामार्फत मल मूत्र घाम श्लेष्म इ.रूपाने  शरीरात साचलेली विषद्रव्ये निघून जातात व शरीर शुद्ध होत असते .काही कारणाने निरनिराळी  विष द्रव्ये उत्सर्जित न होता हळूहळू शरीरात साचत जातात. असे होण्याची कारणे, उत्सर्जनेंद्रियांचा आजार किंवा कमकुवत पणा, त्यांच्या उत्सर्जनक्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात शरीरात विषद्रव्ये निर्माण होणे ,किंवा बाहेरून येणे ही होय.थोडक्यात जीवन शक्तीचे शरीरातील संतुलन बिघडलेले असते .ही विषद्रव्ये प्रमाणाबाहेर साचली की काही तरी रोग होतो . त्या मार्फत ही  विषद्रव्ये बाहेर टाकली जातात .विषद्रव्ये प्रमाणाबाहेर साचल्याचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसतात. मोठ्या माणसांना वारंवार खाज खरुज गजकर्ण नायटा इसब पुरळ गळू उठाणू अवधाण(  खाक व मांडी येथे असलेल्या लहान ग्रंथी सुजणे)येणे ,दीर्घकाळ असणारी अर्धशिशी पोटदुखी स्नायूदुखी इत्यादी .थोडक्यात जुनाट चिवट कोणत्याही औषधांनी बरा न होणारा असा आजार ,हा शरीरात  जास्त प्रमाणात विषद्रव्ये साचल्याचा परिणाम आहे .अश्या दीर्घकालीन चिवट बऱ्या न होणाऱ्या आजारात आपण काही काळासाठी एक नवीन कृत्रिम उत्सर्जनेंद्रिय निर्माण करून दिले पाहिजे .त्या मार्फत ज्यादा साचलेली विषद्रव्ये निघून जातील आणि बरे वाटेल असे तर्कशास्त्र या पोत पद्धतीमागे आहे .हा उपचार बहुधा आयुर्वेदामध्ये सांगितलेला असावा. मला खात्री नाही.कदाचित गावठी वैदूंचा हा उपाय असेल .

.पोत घेणाऱ्या माणसाने चांगला दिवस पाहून शुचिर्भूत होऊन देवाची पूजा वगैरे करून प्रार्थना करावी ."मी हा पोत ,तीन महिने, सहा महिने ,वर्ष ,या कालावधीसाठी घेत आहे मला त्यामुळे बरे वाटू दे. "इत्यादी.असे करण्यामागे थोडा मानसोपचाराचाही भाग असावा .वैद्य किंवा पोत देणारा यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोत घेत असत .पोत अशी तज्ञ व्यक्तीच दुसऱ्याला देत असे.(कदाचित पोत देणाऱ्यालाही पोतकर म्हणत असावेत !).आपले दोन्ही हात जिथे सहज पोचतील ,जी जखम आपल्याला सहज दिसेल ,जिथे आपल्याला जखम व्यवस्थित स्वच्छ करता येईल, अशी जागा असावी .जागा मांसल असावी .साधारण पणे ढोपरा खाली पायाच्या आतल्या बाजूला पोटरीवर  पण फार खाली नाही अशी जागा योग्य असते .पावलांच्या बाजूला (ढोपरापासून दूर )पोत घेतल्यास जखम चटकन भिजण्याचा संभव असतो .जागाही कमी मांसल असते .पायाच्या बाहेरच्या बाजूला पोत घेतल्यास त्याला दुसर्‍याचा धक्का लागण्याचा संभव असतो. जखम पाहणे स्वच्छ करणे इत्यादी गोष्टी कठीण होतात .काही कारणाने आतल्या बाजूला पोत घेण्यास जागा नसेल तर  बाहेरच्या बाजूलाही पोत घेता येतो . हळकुंड घेऊन ते तासून साधारण पेन्सिली एवढ्या जाडीचे लंबगोलाकृती बनविले जाते.जिथे पोत घेण्याचे निश्चित केले असेल, तेथील केस काढून टाकले जातात .त्या ठिकाणी पेनाने एक वर्तुळ काढले जाते .

  त्यावर एक पातळ कापडाचा चौकोनी तुकडा ठेवला जातो .कापडाचा तुकडा ओला केल्यावर खालील शाईचे वर्तुळ दिसू लागते.हळदीचा तुकडा विस्तवावर धरून लाल केला जातो व नंतर तो तुकडा पूर्वी केलेल्या खुणेवर जोराने दाबून धरतात.भाजल्यामुळे मस्तकात कळ जाते .हलू नये यासाठी पाय धरून ठेवावा लागतो .दुसऱ्या दिवशी त्याजागी टरारून फोड येतो .फोडा वरील कातडी कापून टाकली जाते .जखमेच्या आकाराची हळकुंडाची गोळी ,त्या जखमेवर ठेवून वर एक फडक्याची चौघडी केलेली घडी ठेवून दुसऱ्या फडक्याने गच्च बांधून ठेवतात .

रोज नवी गोळी टाकून पुन्हा पहिल्याप्रमाणेच  बांधून ठेवतात .हळू हळू गोळी आत जखम खणीत जाते .रुईच्या पाळाची वाटाण्याएवढी गोळी आत बसेल एवढा खड्डा झाला कि रुईची गोळी आत ठेवून वर  गरजेप्रमाणे  आठघडी सोळाघडी कापडाची घडी ठेवून बांधून  ठेवतात. जखमेतून पू रक्त इत्यादी बाहेर येऊ लागते.जखमेची स्वच्छता ठेवणे रोज घडी बदलणे इत्यादी गोष्टी व्यवस्थित   कराव्या लागतात .ठेवलेली घडी कित्येक वेळा संध्याकाळीही भरून जाते आणि बदलावी लागते .जखम वहाण्याचे कमी झाले कि गोळी बदलावी लागते .हळू हळू आजाराचे प्रमाण कमी कमी होत जाते .पूर्ण बरे वाटल्यावर, किंवा जितक्या महिन्यांसाठी पोत घेतला असेल ,तेवढा काळ गेल्या वर ,गोड्या तेलात कापूस भिजवून जखमेवर ठेवतात व नंतर बांधून ठेवतात.खोबरेल तेल वापरल्यास जखम भरून येते, परंतु पोताच्या ठिकाणी पांढरा डाग पडतो असे म्हणतात.जखम हळूहळू भरून येते. जखम पूर्ण भरल्यावर काहीही करण्याची गरज पडत नाही .रुईच्या पाळाचीच गोळी ठेवावी लागते . जखम चिघळत नाही.वाढत नाही. जखम खोल तेवढीच राहते .व्यवस्थित वहात राहते.बर्‍याच जणांना बरेच बरे वाटते .काही जण पूर्णपणे बरे होतात .डायबेटीस असला तर काय होते? इन्फेक्शन होत नाही का ?मला माहीत नाही . मी कोकणात जेवढे पोतकर बघितले ते सर्व व्यवस्थित होते .त्यातील कित्येकांना बरेही वाटले होते .

माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली होती .कोणत्याही औषधाने बरे होत नसल्यामुळे, त्यांना कोणीतरी पोत घेण्याचे सुचविले . हीमाझ्या जन्मापूर्वी ची गोष्ट आहे .सुमारे पंचाऐशी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे .त्यांना बरेच बरे वाटले .माझ्या जन्मानंतरही त्यांनी अनेकदा पोत घेतला (.आईनेही एक दोनदा पोत घेतला होता) .त्यांना मी गोळी तयार करताना, पोत धुतांना, वगैरे नेहमी पाहिले आहे .त्यांनी एकच चूक केली असे त्यांच्या बोलण्यात आले .त्यांनी सहा महिन्यांत पोत न सोडता तो दोन तीन वर्षे सतत चालू ठेवला .हेतू सर्व विषद्रव्ये व्यवस्थित निघून जावीत . बरे वाटल्यावरही तो चालू होता .त्यामुळे शरीराला  एक नवीन कायमचे उत्सर्जनेंद्रिय मिळाल्यासारखे झाले. शरिराला त्याची सवय झाली .दोन तीन वर्षांनी जेव्हा त्यांनी पोत सोडला तेव्हा ते पुन्हा आजारी पडले .पोत घेतल्यावर त्यांना बरे वाटत असे व सोडल्यावर ते आजारी पडत .कुठे आठ पंधरा दिवस प्रवासाला जायचे असले की ते पोत सोडत.प्रवासाहून आल्यावर पुन्हा घेत .त्यांच्या दोन्ही पायांना आतल्या व बाहेरच्या बाजूला बंदुकीच्या गोळ्या लागल्या सारखे खड्डे पडलेले होते .माझ्या मुंजीच्या वेळी त्यांनी पोत सोडला होता . नंतर ते पुन्हा पोत घेण्याचे विसरले .वर्ष दोन वर्ष ते आजारी होते . त्यांना लवकर निवृत्त व्हावे लागले . पेन्शन घ्यावे लागले .त्यावेळी त्यांचे वय केवळ पंचेचाळीस वर्षे होते .आपण पोत घेतला पाहिजे म्हणजे बरे होऊ हे ते विसरून गेले होते .आईच्याही लक्षात आले नाही .वर्ष दीड वर्षांनंतर लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा पोत घेतला .नंतर त्यांना बरे वाटले .पोत सहा महिने ते वर्ष या कालावधीसाठी का घ्यावयाचा असतो ,त्याहून जास्त का नाही ते त्यांच्या उशिरा लक्षात आले .त्यामुळे पोत जन्माचा त्यांच्या मागे लागला . शरिराला त्याची सवय लागली . उत्सर्जनासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध झाला.पोत ही त्यांची जीवनसाथी बनून गेली .

हल्लीच्या प्रगत शास्त्रानुसार, पोत केव्हां घ्यावा ,कुणी घ्यावा, किती काळासाठी घ्यावा ,घ्यावा कि न घ्यावा ,याची काही पथ्ये व निकष अाहेत का?.मला माहित नाही . तज्ञ सांगू शकतील .हल्ली पोत घेतात की नाही तेही मला माहित नाही .माझ्या लहानपणी म्हणजे सुमारे वयाच्या वीस वर्षांपर्यंत मी कोकणात खेडेगावात तुरळक का होईना पण  पोतकर बघितले आहेत  .त्यानंतर लक्षात तरी आलेले नाहीत .धोतर असतांना पोतकर चटकन ओळखू यायचे .पॅंट लेंगा यांमध्ये पोतकर कसा ओळखणार ?वैद्यच याबद्दल काही व्यवस्थित सांगू शकतील .

२९/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com 

« PreviousChapter ListNext »