Bookstruck

अभागिनी 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते; परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.

सरला विश्वासरावांचे पहिले अपत्य. तिच्या पाठीवर झालेले एकही मूल जगले नाही. सरलेला ना भाऊ ना बहीण. आणि सरलेची आईही शेवटी एका बाळंतपणातच वारली. सरस्वतीबाई सरलेला सोडून गेल्या. मरताना त्या पतीला म्हणाल्या, ‘तुम्ही पुन्हा लग्न करा. सरला लहान. स्वत:चे हाल नका करू.’

परंतु काही वर्षे विश्वासराव तसेच राहिले. त्यांचे संसारातून लक्ष जणू उडाले. त्यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्याचे कारण दाखवून लवकरच पेन्शन घेतली. आणि पुण्याला एक लहानसा बंगला बांधून तेथे ते राहिले. सरला व विश्वासराव दोनच माणसे. बंगल्यात बि-हाडाला जागा ते देत नसत. माणसांचा जणू त्यांना तिटकारा असे. त्यांना कोणी मित्रही नव्हता. आप्तेष्टही कधी कोणी येत नसे. बंगल्याभोवती फुले फुलवण्याचा त्यांना विलक्षण नाद. त्यातच त्यांची सकाळ-सायंकाळ जाई. फुलांकडे ते पाहात राहायचे. तर्‍हेतर्‍हेची सुंदर फुले, शोभेची फुले, सुगंधी फुले. रस्त्यातून जाणारे-येणारेही त्या फुलांकडे पाहात राहात. कमानीवरील फुलवेलीकडे पाहात राहात.

विश्वासराव फुलांची काळजी घेत. परंतु सरलेची काळजी घेत नसत. फुले किती हळुवारपणे ते फुलवीत. परंतु सरलेशी ते कठोरपणे वागत. ते फुलांशी बोलत, त्यांना कुरवाळीत; परंतु सरलेशी ते प्रेमाने बोलत नसत, तिला कधी जवळ घेत नसत. तिच्या केसांवरून वात्सल्याचा हात फिरवीत नसत. ते तिला जेवू-खाऊ घालीत. तिला कपडेलत्ते पुरवीत. शाळेत पाठवीत. पुस्तके देत. परंतु प्रेम देत नसत. सरलेला प्रेमाशिवाय सारे काही मिळत असे.

एखाद्या वेळेस ती जर फुलझाडांना पाणी घालू लागली तरी विश्वासराव रागावत.

“तू नकोस पाणी घालू.’ ते म्हणत.

“का हो बाबा?’ ती खिन्नतेने विचारी.

“तू पाणी घातलेस तर ती फुले मरतील. ती झाडे सुकून जातील.’

“माझे हात का विषारी आहेत?’

“असे एखाद्या वेळेस वाटते.’

“मग तोडून टाका हे हात ! मारून टाका मला !’

“ते देवाच्या हाती.’

Chapter ListNext »