Bookstruck

अभागिनी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सरला आपल्या खोलीत जाऊन रडत बसे. ती हातात चाकू घेई. परंतु बोटे तोडण्याचे तिला धैर्य होत नसे. एखाद्या वेळेस पित्याच्या नकळत ती त्या फुलांजवळ जाई, त्यांच्यावरून हात फिरवी, फुले सुकून जातात की काय ते ती पाही. परंतु फुले सुकून जात नसत. ती आनंदी दिसत, नाचत, डोलत. सरलेचे मुखपुष्प पाहून जणू त्या फुलांना आनंद होई. परंतु सरलेला रडू येई. तिच्या डोळयांतील पाणी फुलांवर पडे. ती फुले कावरीबावरी होत.

सरलेच्या फार मैत्रिणीही नव्हत्या. तिचा स्वभाव घुमा झाला होता. मनाचा मोकळेपणा नाहीसा झाला होता. ती कधी कधी एकटीच फिरायला जात असे. एकटीच टेकडीवर जाऊन बसत असे. एकटीच कालव्याच्या काठी बसत असे. बाभळीची ती सुंदर पिवळी फुले तिला फार आवडत. त्याचा मंद वास तिला आवडे. ती मनात म्हणे, ‘या काटेरी बाभळीसही अशी सुंदर सुकुमार फुले यावीत. परंतु माणसांची मने कठोर का असावीत?’

एखाद्या वेळेस तिला घरी यायला उशीर झाला तर पिता रागे भरे. एके दिवशी तर ती बर्‍याच उशिराने आली.

“सिनेमाला गेली होतीस की काय’

“नाही.’

“मग एवढा वेळ कोठे होतीस?’

“कालव्याच्या काठी बसले होते.’

“एकटीच?’

“दुसरे कोण आहे मला?’

“तेथे बसून काय करीत होतीस?’

“आईला आठवीत होते, रडत होते.’

“घरात नाही वाटते रडता येत?’

“रडायलाही तुमची भीती वाटते.’

“उद्यापासून उशीर झाला तर बघ. या घरात राहायचे असेल तर आठाच्या आत फिरून आलेच पाहिजे.’

असे दिवस जात होते. परंतु अकस्मात विश्वासरावांनी पुन्हा लग्न केले. एका गतधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. बंगल्यात नवीन माणूस आले. रमाबाई आनंदी होत्या. सरलेजवळ त्या पुष्कळ बोलत. प्रथम प्रथम त्यांनी पुष्कळ प्रेमही दाखविले. सरलेच्या केसांत त्या फुले घालीत. त्या तिला सिनेमाला घेऊन जात. सरला जरा सुखी दिसू लागली. विश्वासरावही सरलेशी प्रेमाने बोलू लागले.

“सरले ये पाणी घालायला.’

“फुले सुकतील हो बाबा.’

“आता नाही सुकणार.’

“का बरे?’

“असे वाटते खरे.’

« PreviousChapter ListNext »