Bookstruck

अभागिनी 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कीव करण्यासारखी माझीच स्थिती आहे. त्यांचे बोलणे मी मनावर घेतले नाही. एवढयाने काय होणार? एवढयाने काय परिस्थितीत फेर पडणार आहे? त्यांचे प्रेम, त्यांची सहानुभूती थोडीच मिळणार आहे? मी घरीदारी बहिष्कृत आहे. सर्वांकडून माझा तिरस्कार होतो. मी कोणासही नको. जीवन कसे कंठावे, कसे जगावे? ज्याला सुखवायला कोणी नाही; ज्याला धीर द्यायला, प्रेम द्यायला कोणी नाही, ज्याचे अश्रू पुसायला कोणी नाही, ज्याला सहानुभूती दाखवायला कोणी नाही, ज्याला आधार नाही, कोठे विसावा नाही, ज्याला पाहून कोणाला आनंद होत नाही अशा माणसाने कशाच्या जोरावर जगावे? हे उदास जीवन त्याला कसे सहन होईल? खरे ना? तुम्ही जा. मी एकटी घरी जाईन. मी एक अभागिनी आहे. माझे दु:ख व मी; माझी निराशा व मी; माझे अश्रू आणि मी; दुसरे कोणी नको माझ्याबरोबर. खरेच जा. का घुटमळता? तुम्हाला माझी दया येते? तुम्हाला        माझ्याविषयी सहानुभूती वाटते? छे: शक्य नाही. आणि काही वाटत असले तरी ते क्षणभर. माझी नवी आई माझ्यावर प्रेम दाखवू लागली होती. मी सुखी होऊ लागले होते. परंतु ते प्रेम आळवावरचे पाणी ठरले. आता नको कुणाचे प्रेम. मागून अधिकच निराशा पदरी येते. हे काय? तुमचे डोळे भरून आले? पुरुष ना तुम्ही? जा. खरेच जा. पुसा डोळे. हा घ्या माझा रूमाल. पुसा. माझ्यासाठी नका रडू. जिच्यासाठी कोणी रडावे अशी नाही हो मी. तुमचे अश्रू मला मिळावेत इतकी भाग्यवान मी नाही. माझे रक्त तुम्ही पुसलेत; तुमचे अश्रू मी पुसू? पण नको, हे हात विषारी आहेत. तुमच्या डोळयांना त्यांचा स्पर्श नको. जा खरेच जा. माझा विचार सोडा. जिच्या दुर्दैवाला अंत नाही अशी पराकाष्टेची मी अभागिनी आहे.

« PreviousChapter ListNext »