Bookstruck

बाळ, तू मोठा हो 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आईचा तो एकुलता एक मुलगा होता.  त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील अशी आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती सारे अपमान गिळी, सारे दु:ख विसरे. सार्‍या हालअपेष्टा सहन करी. त्याच्यावर तिचे किती प्रेम ! आईच्या प्रेमाला आधीच सीमा नसते. त्यातून एकुलता एक मुलगा असावा, आई विधवा असावी, दरिद्री असावी, आणि मग त्या मुलाविषयी तिला जे वाटत असेल, त्याची कल्पना कोण करू शकेल?

बाळाचे नाव होते उदय. सुंदर नाव. परंतु उदयचा जन्म झाला नि थोडयाच दिवसांत जन्मदात्या पित्याचा अस्त झाला, बाळाच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवून पिता देवाघरी गेला. शेवटचे मुके घेऊन, बाळाला हृदयाशी धरून त्याने डोळे मिटले. उदयला ते काहीएक आठवत नाही. एखाद्या वेळेस उदय आईला विचारतो, “आई, बाबा कसे ग दिसत? कसे होते?”
“त्यांच्यासारखाच तू आहेस. असेच डोळे. काय सांगू बाळ? तू मोठा हो म्हणजे झाले.” असे माता म्हणे.

उदयची आई गरीब होती. घरदार नव्हते. प्रथम ती नाशिकला राहात होती. एका लहानशा खोलीत राहात होती. कोणाकडे चार कामे करी. काही किडूकमिडूक जवळ होते. बाळाला वाढवीत होती. उदयचा एक मामा होता. तिकडे वर्‍हाडात होता. पोलिसखात्यात होता. मोठा करारी. अधिकाराचा भोक्ता. एकदा हे मामा नाशिकला आले होते. त्र्यंबकेश्वराच्या यात्रेसाठी आले होते. गरीब बहिणीकडे उतरले होते.

“आई, मामाबरोबर मी जाऊ का यात्रेला?”

“नको. आपण पुढे जाऊ हो.”

“मी जाणार. मी मामांना विचारू? मामा मला नेतील. विचारू का? जाऊ का आई?”

“नको म्हणून सांगितले ना !”

तिला तो मिंधेपणा वाटत होता. मामाने आपण होऊन नेले तर निराळी गोष्ट. त्याला विचारायचे कशाला? आणि मामा, मामी, मुले निघाली. उदय रडत होता.

“त्याला न्यायचे का?” मामीने विचारले.

“उगीच गर्दीत हरवायचा. कशाला? आईचा एकुलता लाडका मुलगा.”

“परंतु तो रडत आहे. वन्स, नेऊ का त्याला? राहील का नीट बरोबर? ऐकेल का सांगितलेले?”

उदय का त्या गोष्टी विसरेल? ते शब्द का विसरेल? आणि एके दिवशी ती एक गंमत ! एकदा त्याची एक दूरची आत्या आपल्या मुलासह त्यांच्याकडे आली होती. आणि आई व आत्या दोघी बाहेरच बसल्या. उन्हामुळे उदयची शाळा सकाळी होती. आत्याचा मुलगा भातभाजी करून ठेवी आणि शाळेतून आल्यावर उदय वाढी.

“रोज रोज वाटते मीच वाढायचे?”

« PreviousChapter ListNext »