Bookstruck

बाळ, तू मोठा हो 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आय.सी.एस.ला जाण्याइतका मी हुशार नाही. थोडेफार शिकून आईला केव्हा एकदा विश्रांती देईन असे झाले आहे. किती दिवस तिने कष्ट करावे, दुसर्‍याकडे काम करावे? आणि सारे माझ्यासाठी.”

“आईला हातांनी स्वयंपाक करून वाढणार काय?”

“लग्न नाही झाले तर हातांनी स्वयंपाक करीन.”

“कोठे ठरले आहे का रे लग्न?”

“कोठे ठरवू?”

“कॉलेजात मुली पुष्कळ असतात.”

“परंतु मी फुलपाखरू नाही. पैशाचे रंग माझ्याजवळ नाहीत. आणि कॉलेजातील प्रेमे म्हणजे ती तात्पुरती प्रतिष्ठा असते. ती तात्पुरती ऐट असते. शेवटी दुसरेच प्रश्न पुढे येतात. प्रेमे उडून जातात. कोणाची कोठे तरी लग्ने होतात. कॉलेजी प्रेमे पुढे मंगलमय विवाहात परिणत झालेली फारशी दिसत नाहीत.”

“तू एखाद्या तत्त्वज्ञान्यासारखे बोलत आहेत.”

“उदय, म्हातारा झालास की काय?”

“दारिद्रयाने लौकर वार्धक्य येते. कशाचेच नीट पोषण होत नाही. ना मनाचे, ना तनाचे. ना बुध्दीचे, ना भावनांचे.”

अशी भाषणे चालली होती.

“तो विडा तर खा.” नली म्हणाली.

उदयने विडा खाल्ला. परंतु विडा खाण्याची त्याला सवय नव्हती. त्याने पटकन खाल्ला.

“तुझा विडा मुळीच रंगला नाही.” बंडू म्हणाला.

“विडासुध्दा तुला खाता येत नाही !” नली म्हणाली.

“शिकेन पुढे दैवात असेल तर.” उदय म्हणाला.

« PreviousChapter ListNext »