Bookstruck

बाळ, तू मोठा हो 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तू का दैववादी आहेस?”

“बंडू, शेवटी काही तरी दैव म्हणून असतेच. आपण प्रयत्न करतो, धडपडतो. परंतु काही अज्ञात शक्ती असतात. त्या आपल्याला कोठेतरी खेचून नेत असतात. मानवी जीवन म्हणजे मानवी प्रयत्न व अज्ञात शक्ती त्यांचे फलित होय. काही दिवस आपणांस वाटते की, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या प्रयत्नांप्रमाणे सारे होत आहे. अकस्मात प्रचंड वारे येतात. सारे उभारलेले धुळीत मिळते.”

नलीने आता फोनो लावला. आणि उदय गुणगुणू लागला.

“नल्ये, उदय डोलतो आहे.”

“दादा, गाणे सर्वांना आवडते.”

उदय काही बोलला नाही. थोडया वेळाने तो जायला निघाला.

“उदय, येत जा मधून मधून. आपण खेळू, बोलू.” नली म्हणाली.

“रात्री ये, पत्ते खेळू.” बंडू म्हणाला.

“मला नवे खेळ येत नाहीत.”

“आम्ही शिकवू.”

उदय गेला. परंतु तो सुटी होती तरी लौकरच जळगाव सोडून गेला.

“आई, येथे उन्हाळा फार आहे. मी पुण्यास जातो. अभ्यासही करीन. आता शेवटचे वर्ष. चांगल्या रीतीने पास झाले पाहिजे. जाऊ का?”

“जा. प्रकृतीस जप. जपून अभ्यास कर. तुझे शिकणे केव्हा संपते इकडे माझे डोळे आहेत.”
आणि उदय पुण्यास गेला. त्याची ती खोली होती. त्याने अभ्यास सुरू केला. आणि आता कॉलेजही सुरू झाले. पुणे विद्यार्थ्यांनी गजबजले, परंतु उदय एकाकीच होता. त्याला ना स्नेही ना सोबती. तो रोज संध्याकाळी कोठेतरी फिरायला जात असे. कधी पर्वतीकडे, कधी चतु:शृंगीकडे. स्वत:च्या विचारसृष्टीत तो विचार करीत फिरत असे.

परंतु सरलेची गाठ पडल्यापासून त्याची सृष्टी बदलली. त्याच्या सृष्टीत नवीन प्रकाश आला, नवीन हवा आली. त्या दिवशी रात्री तो खोलीत आला व सचिंत बसला. विचार करीत बसला. सरलेचा रूमाल त्याच्या जवळ राहिला होता. तिने अश्रू पुसण्यासाठी तो त्याला दिला होता. तो द्यायला तो विसरला का त्याने मुद्दाम दिला नाही? त्याचा रूमाल तिच्या कपाळावर बांधलेला होता आणि तिचा रूमाल त्याच्या खिशात होता. तो रूमाल हातात घेऊन तो बसला होता. तिचे नाव त्याला माहीत नव्हते. परंतु रूमालाच्या कोपर्‍यात नाव होते.

« PreviousChapter ListNext »