Bookstruck

मायलेकरे 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ध्वनी म्हणजे सूचकता हा काव्याचा आत्मा मानतात. ती सूचकता किती सुंदरतेने वरील ओवीत प्रकट झाली आहे ! शेवंतीला गोड पिवळी फुले का येतात ? माझ्या तान्हेबाळाच्या न्हाणाचे पाणी तिला मिळते म्हणून. त्याच्या अंगाची हळद पाण्याबरोबर जाते. त्यातून ही फुले फुलतात. बाळाच्या सौंदर्याचे याहून कोणते वर्णन अधिक असू शकेल ? देवाच्या कृपाकटाक्षाने भाग्ये येतात. बाळाच्या न्हाणाच्या पाण्याने शेवंती बहरतात.

मूल आधीच सुंदर असावे. त्यात त्याला अलंकार घातले म्हणजे तर सौंदर्याला पूरच येतो :

तान्हिया रे बाळा        तुला काय साजे
गळयांत बांधीजे                वाघनख ॥
गळयांत हांसोळी            कमरे सांखळी
मूर्ति साजिरी गोजिरी            तान्हे बाळाची ॥

परंतु श्रीमंत माताच आपल्या लेकराला असे सजवील. गरीब आईने काय करावे ? गरीब आई काय म्हणते ते पहा :

श्रीमंतीचा डौल            तुझा बाई पुरे कर
सोनेरी चंद्रकोर                माझे बाळ ॥
माझ्या ग बाळाला        नको हो दागिना ॥
कोंवळया लावण्या            पूर आला ॥

सोनेरी चंद्रकोर, ती का आणखी सजवायची ? ‘कोवळे लावण्य’ हा शब्दप्रयोग किती रसमय आहे नाही ?

गरीब माता आपल्या अश्रूंच्या हारांनी बाळाला सजवील. प्रेमाने रंगवील.

गरीब माउली            काय मुला लेववील
प्रेमाने रंगवील                राजसाला ॥
आसवांची माळा            गळां घालील बाळाचे
गरीब माउलीचे                काय दुजें ॥

श्रीमंतांच्या बायका दागदागिने अंगावर घालून जातील. गरीब आईने काय करावे ?

सखिये लेणे लेती        आपुले हारदोरे
आपण दाखवूं                 आपुलें बाळ गोरें ॥

ही ओवी ऐकून मी नाचलो. श्रीमंत मैत्रिणींनी ते मोत्यांचे हार- ते दोरे- गळयात बांधले. मजजवळ तसले सोनेरी दोरे नाहीत. असली श्रीमंती मला जगाला दाखवता नाही येणार. परंतु मजजवळ एक वस्तू आहे. एक अमोल अलंकार आहे. माझे हे गोरेगोमटे बाळ, हाच माझा दागिना. ही माझी संपत्ती. ही मी जगाला दाखवीन व स्वत:ला धन्य मानीन.

तान्हे बाळ वाढते, मोठे होते. ते रांगू लागते. हिंडू फिरू लागते :

रांगुनी खेळूनी            बाळ उंबर्‍यात बसे
सोन्याचा ढीग दिसे            तान्हेबाळ ॥

उंबर्‍यात बसलेले मूल आईला सोन्याची रास वाटते. इंग्रजीत “सिलास मार्नर” म्हणून जगतप्रसिध्द कादंबरी आहे. तो सिलास एकटा असतो. एके दिवशी पहाटेच्या वेळी त्याच्या दारात एक लहान मूल ठेवलेले आढळून येते. सिलास म्हणतो, “सोने, माझे सोने.” हे सोने निर्जीव नाही, हासते खेळते सोने आहे. बाळ रांगू फिरू लागला म्हणजे आईला आनंद होतो व काळजीही वाटते. त्याच्या गुडघ्यांना खडे बोचतील, रांगत कोठे दूर जाईल असे भय वाटते :

अंगणीचे खडे            मी ग लोटीत नित्यानें
रांगतो गुडघ्याने                गोपूबाळ ॥
शेजारणीबाई            दाट घाली सडा   
बाळ माझे ग रांगते            त्याला टुपेल हा खडा ॥

« PreviousChapter ListNext »