Bookstruck

मायलेकरे 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रांगणारा बाळ चालू लागतो. त्याला पाय फुटतात, पंख फुटतात. तो तांदूळ उडवतो, फुले कुसकरतो, पाणी सांडतो, पीठ उडवतो, मातेला आवरता आवरत नाही. शेजारी जातो व खोडया करतो, शेजी रागावते :

दळणाची पाटी            ठेवू मी कोणीकडे
हिंडते चोहींकडे                तान्हें बाळ ॥
शेजारिणी बाई            आटप मोगरा
अचपळ माझा हिरा            गोपूबाळ ॥

एखादे वेळी शेजी रागावते व शिव्या देते. मातेची तगमग होते. ती शेजीच्या पाया पडते.

पुरे कर शेजीबाई            किती मी क्षमा मागू
आहेत तुझी मुलें                तुला मी काय सांगूं ॥
चुकले माझें बाळ        तुझ्या किती पायां लागूं
पुरे कर शेजीबाई                आपण प्रेमाने ग वागूं ॥

तुलाही मुले आहेत. तुझे मातृहृदय आहे. असे आई शेजीला म्हणते. याहून आणखी बुध्दिवाद कोणता ? शेजीने तरीही तोंडाचा पट्टा सुरूच ठेवला तर माता म्हणते

शेजीनें वाहिली            शिव्यांची लाखोली
पुष्पपूजा झाली                बाळराजा ॥
शेजीनें दिली शिवी        लागली माझ्या जीवी
आयुष्याची तुला ओंवी            तान्हेबाळा ॥
शेजीने दिली शिवी        वेचून घेतली
कळी मी मानीली            जाईजुईंची ॥

शेजीच्या शिव्या म्हणजे बाळाला “शताउक्षी” म्हणणारे आशीर्वादच आहेत असे थोर समाधान माता स्वत:चे करून घेते.

बाळाच्या कामात मातेचा सारा वेळ जातो. त्याला आंगडे-टोपडे शिवायचे, बाळकडू घालायचे, त्याच्या टोपडयाला गोंडे लावायचे, त्याला न्हाऊमाखू घालायचे, काजळ-तीट लावायची, अशी या बालब्रह्माची सेवा करून माता मुक्त होते. ती सारे विसरते :

शेजी आली घरा            बैस म्हणाया चुकल्यें
तुझ्या कामांत गुंतल्यें            तान्हेबाळा ॥

बाळसुध्दा नाना हट्ट घेतो. त्याला नाना खेळणी हवीत, सारे हवे. तो खेळणी हरवतो. ती शोधावी लागतात, गायीच्या गोठयात बाळाची खेळणी पडतात. वासराजवळ तो खेळतो. तेथे खेळणी विसरतो.

गायीच्या गोठयांत        सर्पाची वेटोळी
तेथे तुझा चेंडूफळी            गोपूबाळा ॥

आता ती चेंडूफळी कशी आणायची ? परंतु बाळाच्या हट्टापुढे काय ?

आणली चेंडूफळी            सर्पाच्या जवळून
सर्प भुले सर्पपण                मातेसाठी ॥

« PreviousChapter ListNext »