Bookstruck

पहिली माझी ओवी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रसपरिचय

फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रो.वासुदेवराय पटवर्धन मराठी शिकवीत होते. त्यांनी मुलांना विचारले, “तुम्हाला मराठीतील अभिजात छंद माहीत आहे ? मराठीतील अभिजात वृत्त कोणते ?” मुलांना उत्तर देता आले नाही. मग प्रो.पटवर्धन एकदम म्हणाले, “ओवी. हा मराठीतील अभिजात छंद आहे. मराठीतील महाकाव्ये याच वृत्तात आहेत. स्त्रियांनी याच वृत्तात स्वत:ची सुखदु:खे सांगितली. तुम्ही कोणी एखादी ओवी म्हणून दाखवता ?” मुले हसली. कोणी ओवी म्हणेना, तेव्हा पुन्हा प्रो.पटवर्धनांनी:

पहिली माझी ओवी         पहिला माझा नेम
तुळशीखालीं राम             पोथी वाची

ही ओवी म्हटली व म्हणाले, “ओवी वृत्त फार गोड,”

“पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम” ही ओवी कोणाला माहीत नाही ! मी प्रस्तुत प्रकरणाला “पहिली माझी ओवी” हेच नाव दिले आहे.

पहिली माझी ओवी, दुसरी माझी ओवी असे करीत करीत एकविसावी माझी ओवी. येथपर्यंत मजल येते. या पध्दतीच्या किती तरी ओव्या आहेत. मोठा सुंदर प्रकार आहे. यात बुध्दिमत्ताही लागते. पहिल्या चरणात पहिली, दुसरी, तिसरी, असे शब्द आरंभी असतात, तर दुसर्‍या चरणाच्या आरंभी त्या त्या संख्येइतके काही तरी सांगितलेले असते. उदाहरणार्थ:

पांचवी माझी ओंवी         पांच पांडवांना
पाठीच्या भावंडांना             राज्य येवो

या ओवीच्या पहिल्या चरणाच्या आरंभी “पांचवी” असा शब्द आहे तर दुसर्‍या ओवीच्या आरंभी पाच पांडव असे आहे. स्पष्ट कल्पना येण्यासाठी आणखी एक ओवी देतो:

सातवी माझी ओवी         सात सप्तऋषि
कौसल्येच्या कुशीं             रामचंद्र

कधी कधी दुसर्‍या चरणाच्या आरंभी संख्यादर्शक वस्तू नसून निराळीच गंमत केलेली असते :

विसांवी माझी ओवी         विसांवा माहेराला
आईच्या आसर्‍याला             सुखशांती

या ओवीत पहिल्या चरणात विसावी हा शब्द असल्यामुळे काही तरी वीस दुसर्‍या चरणात हवेत. परंतु विसाव्या ओवीतील “विसावी” हा शब्द “विसावा” या समानोच्चारक शब्दाशी जोडला आहे. अशा ओव्यांतून संख्यादर्शन वस्तू नसते. परंतु अशा ओव्या फार थोड्या आहेत.

कधी कधी या प्रकारात ओवीच्या पहिल्या चरणातील संख्यादर्शक शब्दाशी यमक आणणारा शब्द दुसर्‍या चरणाच्या आरंभी घालतात:

पहिली माझीं ओवी         वहिला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा             राजबिंडा

या ओवीत “पहिली” या शब्दाशी “वहिला” या शब्दाचे यमकमय सादृश्य आहे.

या ओव्यांतील काही काही ओव्या फारच सुंदर आहेत. संसारात सुख पाहिजे असेल तर शेजार्‍यापाजार्‍यांशी प्रेमाने वागले पाहिले; दुजाभाव कमी करीत गेले पाहिजे असे एका ओवीत सांगितले आहे:

दुसरी माझी ओंवी         दुजा नको भाव
तरीच पावे देव                 संसारात

कधी कधी तिसर्‍या व चौथ्या चरणात अर्थान्तरन्यास असे एखादे वचन असते:

नववी माझी ओंवी         आहेत नवग्रह
संसारी आग्रह                 धरूं नये
पांचवी माझी ओंवी         आपुली पांच बोटें
त्यांनी कधी कर्म खोटे             करूं नये

अशी सुंदर सुभाषिते शेवटच्या चरणातून असतात.

ही एक गोड ओवी पहा:

सोळावी माझी ओंवी         सोळा चंद्रकला
पतीच्या ग कला             सांभाळावें

एक बाई सांगते :

एकुणिसावी माझी ओंवी     एकोणीस वर्षे
नेलीं मी ग हर्षे                 संसारात

« PreviousChapter ListNext »