Bookstruck

पहिली माझी ओवी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका स्त्रीचे हे वर्णन ऐका:

पहिली माझी ओंवी         पहिली कामाला
स्मरते रामाला                 अंतरंगी

हातात काम व मुखात रामनाम अशी ही थोर सती आहे.

कधी कधी तात्त्विक विचार या ओव्यांतून असतात. योगशास्त्रातील गोष्टीही मांडलेल्या असतात. पुराणे वगैरे ऐकायला जाणार्‍या बायकांना सारी माहिती असते:

सतरावी माझी ओंवी         सतरावीचे दूध
योगी पिती शुध्द             समाधींत
दहावी माझी ओवी         दश इंद्रियांचा
अकराव्या मनाचा             खेळ सारा

काही ओव्यांतून सामाजिक व ऐतिहासिक गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत:

पहिली माझी ओंवी         सदा एकींचे पालन
घरी बेकी होतां जाण             राज्य गेलें
अठरावी माझी ओवी         अठरापगड जाती
गांवांत नांदती                 आनंदानें

गावगाडा सुरळीत चालला आहे असे ही भगिनी सांगते. तसेच आपल्यातील दुहीने राज्य गेले असे ती बजावीत आहे.

तुकाराम महाराज्यांसारख्यांनीही पहिली माझी ओवी, दुसरी माझी ओवी या प्रकारच्या ओव्या केल्या आहेत. त्यांनाही स्त्रियांच्या वाड्.मयातील हा प्रकार आवडला असावा. या प्रकरणात तुकाराम महाराजांच्या या पध्दतीच्या दहा ओव्या दिल्या आहेत. सोवळ्या बायकांना या ओव्या येतात; स्नानाच्या वेळेस वगैरे त्या म्हणतात. शेवटच्या ओवीत तुकाराम महाराज म्हणतात:

दहावी माझी ओवी         दाही अवतारां
घाली संवसारा                 तुका म्हणे

“तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हांसी” त्याचीच येथे आठवण होते. लोकसेवेसाठी पुन्हा पुन्हा संसारात यावयास तुकाराम तयार आहेत. भगवान बुध्दही म्हणत असत की, “जगात जोपर्यंत कोणी दु:खी आहे, तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन; कंटाळणार नाही.”

या ओव्या झोपाळ्यावर बहुधा भराभरा रचलेल्या असाव्यात. एकीने “पहिली माझी ओवी” असे म्हटले की दुसरीचे लगेच “दुसरी माझी ओवी” असे म्हणायचे. भराभर त्या त्या संख्या दर्शविणार्‍या वस्तू आठवल्या पाहिजेत. नऊ म्हणताच नवग्रह, दहा म्हणताच दाही दिशा, एकवीस म्हणतांच गणपतीच्या एकवीस दूर्वा किंवा एकवीस मोदक हे पटपट आठवले पाहिजे. हा ओवीप्रकार गोड आहे खरा.

« PreviousChapter ListNext »