Bookstruck

सारखा चाले उद्‌धार - पोर...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सारखा चाले उद्‌धार - पोरगं आहे द्‌वाड

त्यापेक्षा देवा मला झाड कर, झाड ॥

वाण्याकडच्या फेर्‍यांची नसेल मग कटकट

दादा अन् ताईची टळेल सारी वटवट

उभं राहून दिनरात, दुखेल हाडन्‌हाड

तरीसुद्‌धा आवडेल मला झाद व्हायला झाड...

झाडाला पण देवा, असते का रे आई ?

सांग बरं मग ते उन्हात कसे जाई ?

एवढंसं खेळून, आम्ही मात्र उनाड

म्हणून म्हणतो देवा मला झाद कर, झाड...

खुशाल चिडवोन कुणी, घर माझं उन्हात !

चिंब चिंब खेळेन मी गारा-पावसात

सर्दी ना खोकला, ना औषधाची ब्याद

लवकर देवा मला झाड कर, झाड...

सनावळी, कविता मग नको तोंडपाठ

वार्‍यासंगे राहीन मी नवे गीत गात

गाता गाता कधीतरी झोपेन मी गाढ

कर ना रे देवा मला एक वेळ झाड...

वाढदिवशी असतील सारे कपडे नवे

साजरा तो करीन मी वसंतासवे

मखमली हिरव्या वस्‍त्रांनी पुरवी तो लाड

एकवार देवा मला झाड कर, झाड...

कोण बरे म्हणाले ते, जाईल कसा वेळ ?

खारी, पोपट, पाखरांशी मांडेन मी खेळ

पोरंटोरं आली की फळांची पाडापाड

येईल मज्जा देवा मला झाड कर, झाड...

कधीकधी धास्ती घेते मनाचा रे ठाव !

जंगलतोडया माणसांची वाढत आहे हाव !

देवा त्यांना सद्‌बुद्‌धी दे आणि सु-नीती

अशी माझ्या मनातील घालवी भीती...

छाया देईन, माया लावीन वाटसरु धाड

त्याआधी देवा मला झाड कर, झाड...

« PreviousChapter ListNext »