Bookstruck

प्रस्तावना 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९ मैत्रीपारमिता

एखाद्या माणसावर, जातीवर किंवा देशावर प्रेम करणें ह्याला मैत्री न म्हणतां स्नेह म्हणतात. अशा स्नेहानें वैर उद्भवतें. ज्याच्यावर तुम्ही स्नेह करतां त्या माणसासाठीं, जातीसाठीं किंवा देशासाठीं वाटेल तें कुकृत्य करण्यास तयार होतां, व त्यायोगें तुमची अवनति होते. स्वदेशप्रेमानें दुसर्‍या देशाला पादाक्रांत करण्याची हांव धरून युरोपखंडांतील देशांनी आपली कशी दुर्दशा करून घेतली आहे, हें तुम्ही पाहतच आहां. जातीच्या स्नेहानें हिंदुस्थानांतील वरिष्ठ जातीनीं अंत्यजांना खालीं दाबून सर्व देशाला कसें पराधीन करून ठेवलें याचें उदाहरण तुमच्या डोळ्यापुढें आहेच. व्यक्तिगत स्नेहानें किती खून आणि मारामार्‍या झाल्या हें इतिहासांत तुम्ही वाचलेंच असेल. तेव्हां प्रेमाचा असा विपर्यास होऊं न देतां तें सार्वत्रिक होईल यासाठीं तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. भेदभाव न ठेवतां सर्वांवर सारखें प्रेम करणें ह्यालाच मैत्री म्हणतात.

आमचे हातपाय इत्यादिक अवयव भिन्न आहेत, तरी त्यांची सुखदुःखें एक आहेत. त्याप्रमाणेंच जातिपरत्वें आणि देशपरत्वें मनुष्यजाति भिन्न असली, तरी तिचीं सुखदुःखें एक आहेत. तेव्हां दुसर्‍या जातीला किंवा देशाला खालीं पाडून आपण वर येण्याची जे इच्छा धरतात, ते आपलें आणि परक्याचें दुःख सारखेंच वाढवितात. त्यांच्या अज्ञानामुळें आणि दुरभिमानामुळें जगाच्या दुःखांत पुष्कळ भर पडते.

मैत्रीला आरंभ आपल्या आप्‍तइष्टांपासून होतो. परंतु तिची गति कुंठित करणें मोठें पातक होय. सतत अभ्यासानें सगळ्या जगावर पूर्ण मैत्री करण्याची संवय लावून घेतली पाहिजे. पशुपक्ष्यांदिक प्राणीहि माझे सखे आहेत, ते माझ्यावर प्रेम करतात, व मी त्यांच्यावर करतों, अशी भावना केली पाहिजे. दिवसांतून कांहीं काळ एकान्तांत बसून डोळे मिटून तुम्ही अशी कल्पना करा कीं, हिंदु, शीख, मुसलमान, काळा, गोरा हे सर्व माझे सखे आहेत, हे सर्व माझे बांधव आहेत; त्यांची सुखदुःखें तीं माझीं सुखदुःखें आहेत; त्या सर्वांचें कल्याण होवों ! त्यानंतर सर्व जातीचे पशुपक्षी आपले मित्र आहेत अशी कल्पना करा. वाघ तुमच्या मांडीवर निजला आहे असें समजा, व सिंहाला तुम्ही कुरवाळतां अशी कल्पना करा. त्याचप्रमाणें सर्पांसारख्या प्राण्यांवरहि तुम्ही प्रेम करतां व तुमच्यावर ते प्रेम करतात असा विचार करा. याचा परिणाम असा होईल कीं, तुम्ही निर्भय व्हाल, व तुम्हास दुष्ट स्वप्नें पडणार नाहींत.
« PreviousChapter ListNext »