Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 73

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
राजानें कावळ्यांला मारूनच रबी गोंळा करावी असा हुकूम दिला. जो तो धनुष्यबाण घेऊन कावळ्यांच्या मागें लागला, व हजारों कावळे प्राणास मुकले ! तेव्हां शिल्लक राहिलेल्या कावळ्यांना मोठें भय उत्पन्न झालें, व ते सर्वजण बोधिसत्त्वाला शरण गेले. बोधिसत्त्व म्हणाला, ''आमच्या एका जातभाईच्या दुराचरणाचें हें फळ आम्हीं भोगीत आहोंत ! राजाच्या पुरोहिताचा जर त्यानें अपमान केला नसता तर आज सर्व कावळ्यांवर हा प्रसंग गुदरला नसता. आतां मी माझा जीव धोक्यांत घालून देखील या संकटाचें निरसन होईल तर पहातों.''

असें बोलून तो तेथून उडाला आणि एका खिडकींतून राजसभेंत शिरून राजाच्या सिंहासनाखालीं जाऊन बसला. त्याला पकडण्यासाठीं राजाचे दूत धांवले. पण त्यांना राजा म्हणाला, ''माझ्या सिंहासनाचा ज्यानें आश्रय केला त्याच्यावर हल्ला करूं नका. मीं त्याला अभय दिलें आहे.''

हे राजाचे शब्द कानीं पडतांच बोधिसत्त्व सिंहासनाखालून बाहेर आला. आणि राजाला नमस्कार करून म्हणाला, ''महाराज, मला एकट्याला आपण अभय दिलें आहे. परंतु माझ्या हजारों ज्ञातिबांधवांची आपल्या आज्ञेनें हानि होत आहे. पुष्कळजण मृत्युमुखीं पडले आहेत, व आम्ही जिवंत असलेले त्यांच्या शोकानें कष्टी झालों आहों.''

राजा म्हणाला, ''आमच्या पुरोहितानें कावळ्याच्या वसेनें हत्ती बरे होतील असें सांगितल्यामुळें मी हा हुकूम सोडला.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपल्या पुरोहितानें सूड उगविण्याच्या बुद्धीनें ही गोष्ट आपणास सांगितली. कावळ्याच्या पोटांत वसा कोठून असणार ? राजा म्हणाला, ''सर्व प्राण्यांच्या मांसांत वसा सांपडते. तर मग कावळ्याच्या मांसात ती कां नसावी ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आमची कावळ्याची जात मोठी भित्री आहे. सर्व लोकांविषयीं ते साशंक असतात, व त्यामुळें त्यांच्या मांसांत वसा वाढूं शकत नाहीं.''

हें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला, व म्हणाला, ''मीं आजपासून सर्व कावळ्यांना अभयदान देतों.''

एवढ्यानें बोधिसत्त्वाची तृप्ति झाली नाहीं. त्यानें सर्व प्राण्यांला राजापासून अभयदान मागून घेतलें व तो म्हणाला, ''महाराज छंदानें, द्वेषानें, भयानें किंवा मोहानें कोणतेंही कृत्य करीत जाऊं नका. कोणत्याहि कृत्याला आरंभ करण्यापूर्वी नीट विचार करा; कांकीं तुमच्या हातून चूक घडली तर पुष्कळांचें अकल्याण होणार आहे.''

तेव्हांपासून राजा मोठा धार्मिक झाला, व कावळ्याला रोजचा पुष्कळ भात खावयास द्यावा असा त्यानें हुकूम केला.
« PreviousChapter ListNext »