Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 91

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
६९. खळाला मदत केल्याबद्दल प्रायश्चित.

(दूभियमक्कटजातक नं. १७४)


दुसर्‍या एका जन्मीं बोधिसत्त्व काशी राष्ट्रांत ब्राह्मणकुलांत जन्मला होता. मोठा झाल्यावर तो कांहीं कामानिमित्त दूरच्या एका गांवीं जाण्यास निघाला. वाटेंत एक मोठें अरण्य होतें. त्या अरण्यांत एकच फार खोल विहीर होती. विहिरीजवळ जनावरांना पाणी पाजण्यासाठीं एक डोणी ठेविली होती आणि वाटसरू लोक पुण्य संपादण्यासाठीं विहिरीचें पाणी काढून त्या डोणींत भरून ठेवीत असत. परंतु दोन तीन दिवस त्या मार्गानें कोणी वाटसरू न गेल्यामुळें डोणी ठणठणीत कोरडी पडली. बोधिसत्त्व त्या विहिरीजवळ जाऊन हातपाय धुऊन व पाणी पिऊन उभा राहिला. इतक्यांत एक तहानेनें तळमळणारा माकड त्याच्या पहाण्यांत आला. बोधिसत्त्वाला त्या माकडाची फार कींव आली, व आपल्या तांब्यानें विहिरींतून पाणी काढून त्यानें ती डोणी भरली. माकड पाणी पिऊन तृप्‍त जाहला व झाडावर बसून बोधिसत्त्वाकडे वेडें वाकडें तोंड करून पाहूं लागला; तेव्हां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''बा मर्कटा, तुझ्यावर उपकार करण्यासाठीं मी इतके कष्ट सहन केले. या खोल विहिरींतून पाणी काढून तें मी तुला पाजलें आणि आतां तूं अशा प्रकारें माझे उपकार फेडतो आहेस काय ?''

बोधिसत्त्व ज्या झाडाखालीं बसला होता, त्यावर उडी मारून माकड म्हणाला, ''वेड्या ब्राह्मणा, आमाच्या जातींत वेडीं वाकडी तोंडें न करणारा असा तुला कोणी आढळला आहे काय ? पण एवढ्यानें तुला संतोष होत नसला तर आणखीं दुसरें कांहीं कांहीं करून तुझें उपकार फेडण्यास मी तयार आहे.''

बोधिसत्त्व या नीचाबरोबर संवाद करण्यांत अर्थ नाहीं असें जाणून तेथून जाण्यासाठीं उठून उभा राहिला. इतक्यांत माकडानें झाडावरून त्याच्या उघड्या डोक्यावर देहधर्म केला ! बोधिसत्त्व म्हणाला, ''नीचाला मदत केल्याबद्दल मला योग्य प्रायश्चित्त मिळालें !'' असें बोलून त्या विहिरीवर जाऊन बोधिसत्त्वानें स्नान केलें आणि तेथून निघून गेला.
« PreviousChapter ListNext »