Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 92

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
७०. माकडाचा दांभिकपणा.

(आदिच्चुपट्ठानजातक नं. १७५)

आमचा बोधिसत्त्व एका जन्मीं तापस होऊन मोठ्या तापसपरिवारासह हिमालयावर रहात असे. वर्षाकाळीं आपल्या परिवारासह तो जवळपासच्या एका मोठ्या गांवाजवळ येत असे, व वर्षाकाल संपल्यावर पुनः हिमालयावर जात असे. एका पावसाळ्यांत एका गांवाजवळ तो आपल्या परिवारासह भाविक लोकांनी बांधून दिलेल्या पर्णशालेंत रहात होता. सकाळच्या प्रहरीं तापसगण भिक्षेला गेल्यावर एक माकड त्या पर्णकुटिकेंत शिरून फार नासधूस करीत असे. अग्निकुंडांत राख टाकावी; पाण्याचा घडा उपडा करावा; कमंडलु फोडून टाकावे, व सरते शेवटीं देहधर्म करून तेथून निघून जावें ! अशा रीतीनें त्यानें त्या चातुर्मास्यांत ॠषिगणीला फार त्रास दिला. चातुर्मास्य संपल्यावर बोधिसत्त्व आपल्या परिवारासह हिमालयावर जाण्यास निघाला. तेव्हां ग्रामवासी लोकांनीं मोठा उत्सव करून तापसगणांला महादान दिलें. तें पाहून त्या माकडाला फार मत्सर झाला. तो मनाशींच म्हणाला, ''हें जंगलांत राहणारे तपस्वी आहेत. त्यांच्यांत आणि माझ्यांत कांहींच अंतर नसतां लोक यांची पूजा करतात व मी लोकांच्या दाराशीं गेलों असतां दगड मारून मला घालवून देतात. मी जसा फलमूलांवर रहातों, तसे हे तापसलोक फलमूलांवर रहातात. परंतु त्यांच्यासारखें अग्निहोत्रादिकांचें स्तोम मी माजवलें नसल्यामुळें मला त्यांसारखा मान मिळत नसावा !''

असा विचार करून हळूच पर्णशाळेंतून आगीची कोलीत चोरून नेऊन त्यानें उघड्या मैदानांत पंचाग्नि साधनाचें व्रत सुरू केलें. चारी दिशांला चार ठिकाणी अग्नि पेटवून आणि अंगाला राख फासून तो त्या अग्नीच्या मध्यभागीं सूर्याकडे टक लावून पहात बसला. तापसाची पूजा करण्यासाठीं जे लोक येत असत ते आश्चर्यचकित होऊन म्हणत, ''कायहो ! सर्व प्राण्यांमध्यें साधू पुरुष आढळतातच. या वानराचें तप पहा ! हा यःकश्चित प्राणी असून यानें पंचाग्नि साधनाचें कडकडित व्रत चालविलें आहे !''

याप्रमाणें मर्कटांची स्तुति बोधिसत्त्वाच्या कानापर्यंत गेली. तेव्हां तो त्या लोकांना म्हणाला, ''बाबांनों, या माकडाच्या तपश्चर्येला पाहून भुलून जाऊं नका ! याचें चरित्र कसें आहे हें तुम्हांस ठाऊक नाहीं. रोजच्या रोज अग्निशाळेची नासधुस करून यानें आमचे पुष्कळ कमंडलु फोडले आहेत ? आतां आम्हीं जाण्याच्या सुमाराला तो तपस्वी बनूं पहात आहे.''

बोधिसत्त्वाचें हें भाषण ऐकून ते आपल्या काठ्या वगैरे उगारून त्या माकडावर धांवले. तेव्हां त्याचें धैर्य गलित होऊन तो तेथून पळून गेला.
« PreviousChapter ListNext »