Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 103

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
असें म्हणून कांहीं वेळ घरांत बसून नंतर तो सरोवराकडे जाण्यास निघाला. शतपत्रानें त्याच्या पूर्वीच येऊन कांसवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कांसवानें सर्व पाश तोडून टाकले होते. एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळें इतका त्रास झाला कीं, त्याच्या तोंडावाटे रक्ताच्या धारा वहात होत्या आणि अंगांत त्रास न राहिल्यामुळें तो बेशुद्ध होऊन खालीं पडला. इतक्यांत पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्त्वानें शिल्लक राहिलेला पाश आपल्या सामर्थ्यानें तोडून टाकून तेथून पलायन केलें. परंतु बिचारा कांसव पारध्याच्या हातीं लागला. पारध्यानें त्याला आपल्या पिशवींत भरलें, आणि खिन्न मनानें तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठीं कांसवानें आपला जीव धोक्यांत घातला हें पाहून बोधिसत्त्वाला फार वाईट वाटलें, आणि जीव गेला तरी बेहेत्तर, कांसवाला मुक्त केल्यावांचून राहणार नाहीं असा निश्चय करून तो मागें वळला, आणि पारध्याजवळ कांहीं अंतरावर पोहोंचल्यावर लंगडत लंगडत चालूं लागला. सर्व रात्र पाशांत गुरफटून पडल्यामुळें या हरिणाच्या पायाला इजा झाली असावी, व तो दुर्बल झाला असावा असें वाटून पारध्यानें आपली पिशवी एका झाडाच्या मेढक्याला अडकावून दिली, आणि सुरी घेऊन तो हरिणाच्या मागें लागला. त्याला लोभवून बोधिसत्त्वानें दूरवर नेलें, व दुसर्‍या एका आडवाटेनें पळ काढून मेढक्यावर अडकवलेली पिशवी हळूच खालीं पाडून कांसवाला मुक्त केलें. कांसव तात्काल पाण्यांत शिरला. शतपत्र वृक्षावरून खालीं उतरला तेव्हां बोधिसत्त्व या दोघांस उद्देशून म्हणाला, ''तुम्ही दोघांनीं मिळून मला जीवदान दिलें आहे. तेव्हां तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आतां येथें रहाणें धोक्याचें आहे. पारध्याला ही जागा अवगत झाली आहे. आणि येथें राहिल्यास केव्हांना केव्हां त्याच्या जाळ्यांत सांपडण्याची मला भीति आहे. तेव्हां पारधी येथें पोंचण्यापूर्वीच मी घोर अरण्यांत जाऊन रहातों.''

असें म्हणून बोधिसत्त्वानें तेथून पळ काढला. शतपत्रहि उडून गेला. कांसव तर पाण्यांत शिरलाच होता. पारधी धांवत येऊन पहातो, तो पिशवींतील कांसव देखील निघून गेला होता. तुटकें जाळें आणि रिकामी पिशवी घेऊन खालीं मान घालून अत्यंत खिन्न अंतःकरणानें तो आपल्या घरीं गेला. बोधिसत्त्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यांतील दुसर्‍या एका तलावाच्या कांठीं वास करून राहिले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगानें त्यांची मैत्री दृढतर झाली, आणि तिजमुळें त्यांचा सारा जन्म सुखानें गेला.
« PreviousChapter ListNext »