Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 120

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मांधाता म्हणाला, ''या राज्याचा मला वीट आला आहे. माझे पुण्यबळ एवढें मोठें आहे कीं, त्यासमोर चक्रवर्ती राज्य कःपदार्थ आहे. यापेक्षां श्रेष्ठतर असें दुसरें एखादें राज्य असेल तर मला सांगा.''

अमात्य म्हणाले, ''महाराज, पृथ्वीवर आतां आपल्यापेक्षां श्रेष्ठ दुसरे राज्यच राहिलें नाहीं ! आपण सर्व राजाचे राजे आहां ! तेव्हां याहून संपन्नतर राज्यपद कोठून सांपडणार ? आतां देवलोकीचें राज्य याहून चांगले असलें पाहिजे. तेव्हां ते मिळविण्याचा आपण प्रयत्‍न करा.''

राजानें आपल्या चक्राच्या सामर्थ्यानें अमात्यांसह एकदम चातुर्महाराजिक देवलोकीं गमन केलें. या देवलोकांत विरूपाक्ष, धृतराष्ट्र, विरूढ आणि वैश्रवण या चार दिग्पाळांचें स्वामित्व असतें. यांना महाराजा असें म्हणतात. त्या महाराजांनीं मांधात्याचें चांगलें आगतस्वागत केलें; आणि देवलोकीं येण्याचेयं कारण विचारलें. मांधाता म्हणाला, ''पृथ्वीच्या राज्यानें मी कंटाळून गेलों आणि तेथील उपभोगांचा मला वीट आला म्हणून माझ्या अमात्यांसह मी येथें आलों आहे.''

तें ऐकून त्या चार महाराजांनीं मांधात्याला अभिषेक करून आपल्या देवलोकांचें राज्य समर्पण केलें. हजारों वर्षांनीं त्याहि राज्याचा मांधात्याला कंटाळा आला, आणि तो विरूपाक्षादिक चार राजांला म्हणाला, ''या देवलोकापेक्षां रमणीयतर असा दुसरा एखादा देवलोक आहे काय ?''

ते म्हणाले, ''होय सरकार. या देवलोकापेक्षां तावत्त्रिंशद्देवलोक सुंदरतर आहे. तेथील शोभा अपूर्व आहे. ती येथें कशी पहावयास सांपडेल ?''

मांधात्यानें आपलें चक्र वर फेंकून त्याच्या सहाय्यानें अमात्यांसह तावत्त्रिंशद्देवलोकीं गमन केलें. मांधाता आला असें समजतांच इंद्र सामोरा गेला. आणि मोठ्या थाटानें आपल्या वैजयंत प्रासादांत त्याला घेऊन आला व म्हणाला, ''महाराज आपल्या देदीप्यमान चक्रासह आपण येथें कां आला ?''

मांधाता म्हणाला, ''भो शक्र, मनुष्यलोकींच्या आणि चातुर्महाराजिक देवलोकींच्या सर्व उपभोग्य वस्तूंनीं मला कंटाळा आला. अनेक हजार वर्षे या दोन्ही लोकांचें सार्वभौमराज्य मी अनुभविलें; परंतु त्यांत तथ्य दिसून न आल्यामुळें मी या लोकीं राज्योपभोग घेण्यासाठीं आलों आहे.''


« PreviousChapter ListNext »