Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 121

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
इंद्रानें आपलें राज्य द्विधा करून एक भाग मांधात्याला दिला. तेव्हांपासून देवलोकीं दोन इंद्र राज्य करूं लागले. कांहीं काळानें माधात्याला राज्य अर्पण केलेला इंद्र आपल्या पुण्यक्षयानें पतन पावला आणि त्याच्या जागीं दुसरा इंद्र आला. तो मिळालेल्या देवलोकींच्या अर्ध्या राज्यानें संतुष्ट होता. अशा प्रकारें छत्तीस इंद्र उत्पन्न होऊन पतन पावले. तथापि मांधात्याची राज्यतृष्णा शमन पावली नाहीं. स्वर्गाचें अर्ध-राज्य त्याला पुरेसे वाटेना. शक्राला मारून सर्व राज्य हस्तगत करावें असा त्याचा मनोदय होता. पण इंद्राला कोणत्याही उपायानें मारणें शक्य नव्हतें मात्र अशा दुष्ट मनोवृत्तीमुळें मांधात्याच्या पुण्यरूपी वृक्षाचीं पाळें शिथिल झालीं, आणि तो उन्मळून पडला. पुण्यक्षय झाल्याबरोबर मांधात्याला देवलोकीं वास करितां येणें शक्य नव्हतें. गोफणींतून सुटलेल्या दगडाप्रमाणें तो झटदिशीं पृथ्वीवर आपल्या पूर्वीच्या उद्यानांत येऊन पडला. उद्यानपालानें स्वर्गांतून खालीं पडलेल्या या प्राण्याकडे धांव घेतली, आणि तो म्हणाला, ''महाराज दिव्यशरीरधारी असे आपण कोण आहां ?''

इतक्यांत त्याचे अमात्यहि देवलोकांतून त्या ठिकाणीं येऊन पडले. मांधाताराजाला या वेळीं मरणांतिक वेदना होत होत्या. आपल्या अमात्यासह मांधाताराजा उद्यानांत येऊन पडला आहे हें वर्तमान उद्यानपालानें त्या काळीं राज्य करणार्‍या राजाला सांगितलें. तेव्हां तो आपल्या अमात्यांसह उद्यानांत मांधात्याला पहाण्यासाठीं आला. मांधाता जगत नाहीं असें पाहून अमात्य म्हणाले, ''महाराज, आतां जगाला आपला शेवटचा निरोप काय असेल तो सांगा.''

मांधाता म्हणाला, ''हजारों वर्षे मनुष्यलोकींचें, लाखों वर्षे चातुर्महाराजिक देवलोकींचें आणि लाखों वर्षे तावत्त्रिंशद्देवलोकींचें राज्य करून मांधाता राजा अतृप्‍तच मरण पावला ! असें लोकांना सांगा. हाच माझा शेवटला निरोप होय.''

असे उद्‍गार काढून त्यानें प्राण सोडला.
« PreviousChapter ListNext »