Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 129

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
वर्धकिसूकर म्हणाला, ''तर मग आतांच जाऊन आपण त्याच्या आश्रमाला वेढा देऊं आणि त्याचा नाश करूं.''

सर्व डुकर आपणावर धांवून येतात, असें पाहून त्या दुष्ट तपस्व्यानें आश्रमांतून पळ काढला ! पण वर्धकिसूकरानें निरनिराळ्या ठिकाणीं डुकरांला पाठवून, त्याच्या वाटा पूर्वीच आडवून ठेविल्या होत्या. तो घाबरून जाऊन एका उदुंबर वृक्षावर चढला. डुकर वृक्षाभोंवती जमले. पण पुढें काय करावें हें त्यांना समजेना. कांहीं जण निराश होऊन म्हणाले, ''आम्हीं याला पकडण्याची एवढी खटपट केली, पण ती व्यर्थ गेली ! हा आतां आमच्या हातीं कसचा लागतो !''

वर्धकिसूकर म्हणाला, ''गडे हो, आपलें धैर्य सोडूं नका. जर आपण एकजुटीनें काम केलें, तर वृक्षासकट या तपस्व्याला खालीं आणण्याचें आमच्या अंगी सामर्थ्य आहे. आमच्या कळपांत म्हातारे कोतारे असतील त्यांना पाणी आणून वृक्षाच्या मुळांत शिंपू द्या व माझ्यासारखे ज्यांचे दांत प्रखर असतील त्यांना या झाडाची पाळें उकरून काढूं द्या.''

बोधिसत्त्वाच्या आज्ञेप्रमाणें सर्व डुकरांनीं काम करून तें झाड खाली पाडलें, आणि त्या दुष्ट तपस्व्याचा तात्काळ प्राण घेतला ? त्याच ठिकाणी त्यांनीं बोधिसत्त्वाला राज्याभिषेक करून सर्व डुकरांचें स्वामित्व समर्पण केलें. त्या वनांत रहाणारी वनदेवता डुकरांचे संघसामर्थ्य पाहून मोठ्यानें म्हणाली, ''धन्य संघशक्ती ! आणि जे सामग्र्यानें वागतात तेहि धन्य होत ! केवळ संघशक्तीच्या जोरावर या डुकरांनीं वाघाचा संहार करून आपणांस संकटापासून सोडविलें !''
« PreviousChapter ListNext »