Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 130

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
८९. पक्वान्नापेक्षां साधें जेवण चांगलें.

(सालूकजातक नं. २८६)


एका शेतकर्‍याच्या घरीं महालोहित आणि त्याचा धाकटा भाऊ चुल्ललोहित असे दोन बैल होते; व एक सालूक नांवाचा डुकर होता. त्या डुकराला यथास्थित खाण्यापिण्यास देण्यांत येई, तें पाहून चुल्ललोहित आपल्या वडील भावास म्हणाला, ''दादा, आम्हीं या कुटुंबांत पुष्कळ मेहनत करून धान्य वगैरे पैदा करतों, पण आमच्या वांट्याला शेवटीं कडबा आणि भुसाच येत असतो ! पण हा पहा सालूक, कसा घरजांवयासारखा खुशाल मजा मारीत आहे ! खावें, प्यावें इकडून तिकडे फिरावें ! या शिवाय याला दुसरें कांहीं काम आहे तर पहा !''

त्यावर महालोहित म्हणाला, ''बाबारे, उगाच असंतुष्ट होऊं नकोस आमच्या वांट्यांला जें कांहीं आलें आहे तें पुष्कळ आहे. सारा दिवस मेहनत करून थकल्यावर कडबा देखील गोड लागतो. आतां सालूकाचा एवढा मान कां होतों हें तुला लवकरच समजेल ! जेव्हां आपल्या धन्याच्या घरी मंगलकार्य होईल तेव्हां तुला असें दिसून येईल कीं, भुसा आणि कडवा खाण्यांतच सुख आहे, पण सालूकाची चैन नको ! कांहीं अंशीं चैन करणें हें दीर्घायुषी होण्याचे लक्षण नव्हे !''

कांहीं दिवसांनीं त्या शेतकर्‍याच्या घरीं विवाहकार्य उपस्थित झालें; बरीच पाहुणीमंडळी गोळा झाली. दुसर्‍या दिवशीं मालकाच्या नोकरांनीं सालूकाचे हातपाय आणि तोंड बांधून गळ्यावर सुरीचा प्रयोग चालविला ! सालूक मोठमोठ्यानें ओरडूं लागला. चुल्ललोहित तें पाहून महालोहिताला म्हणाला, ''दादा, तुम्ही म्हणत होतां तें यथार्थ आहे ! कां कीं, हा चैन करणारा सालूक अल्पायुषी होऊन प्राणास मुकला; पण आम्हीं कडबा आणि भुसा खाऊन रहाणार अद्यापि जिवंत आहोंत; आणि पुढेंहि आमच्या वाटेस बहुधा कोणीहि जाणार नाहीं.''
« PreviousChapter ListNext »