Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 131

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९०. राजाची कृतज्ञता.

(महाअस्सारोह जाताक नं. ३०२)


एकदां बोधिसत्त्व वाराणसीचा राजा होऊन धर्मन्यायानें राज्य करीत असे. एके वेळीं त्याच्या राज्यांतील सरहद्दीवरील प्रांतांत मोठी बंडाळी झाली. तिचें शमन करण्यासाठीं राजा स्वतः गेला; परंतु एका लढाईत तो पराजित होऊन आपल्या घोड्यावरून पळत सुटला, आणि एका खेडेगांवात आला. तेथें पुष्कळ शेतकर्‍यांजवळ त्यानें आश्रय मागितला पण त्याला नुसतें उभें रहाण्यास देखील कोणी जागा देईना. शेवटीं एका शेतकर्‍याच्या घरी जाऊन तो मोठ्या दीनवाण्या स्वरानें म्हणाला, ''मी आज दोन तीन दिवस उपाशी आहें, आणि माझा घोडा तर तहानेनें आणि भुकेनें व्याकूळ झाला आहे. मला आजच्या दिवसापुरता आश्रय द्याल तर मी आपला फार आभारी होईन.''

शेतकरी म्हणाला, ''आपण जर आमच्या विरुद्ध बंड करणार्‍या इसमांपैकीं नसाल तर आमच्या घरीं दोन दिवस खुशाल रहा.''

राजा म्हणाला, ''मी वाराणसी राजाचाच नोकर असून त्याच्याच सैन्याबरोबर येथवर आलों आहें.''

तें ऐकून शेतकर्‍यानें त्याच्या घोड्याचा लगाम धरून त्यास खालीं उतरण्यास सांगितलें, आणि घोडा बाजूला नेऊन एका झाडास बांधला. नंतर आपल्या बायकोकडून पाणी आणून या नवीन पाहुण्याचे पाय धुतले, व आपल्या घरीं असलेली भाजीभाकरी त्याला खावयास घालून एका बिछान्यावर विश्रांति घेण्याची विनंति केली. एवढें झाल्यावर त्याच्या घोड्याचें सामान वगैरे काढून त्याला खरारा केला आणि दाणापाणी देऊन त्याच्या पुढयांत चांगली ताजी वैरण टाकली. या रीतीनें त्या शेतकर्‍याच्या घरीं राजाचा दोन तीन दिवस उत्तम पाहुणचार राखण्यांत आला. शेतकर्‍याचा निरोप घेऊन जातेवेळीं राजा म्हणाला, ''मी आमच्या महाराजाच्या मर्जीतला एक योद्धा आहे. मला थोरला घोडेस्वार असें म्हणतात. यदाकदाचित् तुमच्यावर कांहीं खटला वगैरे होऊन राजद्वारीं जाण्याचा प्रसंग आला, तर तुम्ही प्रथमतः मला येऊन भेटा म्हणजें आमच्या महाराजाला सांगून मी तुमचें काम करून देईन.''

शेतकर्‍यानें त्याचे आभार मानिले. तेव्हां राजा तेथून निघून गेला, आणि आपल्या सैन्याला जाऊन मिळाला. पुढें वाराणसीहून सैन्याची यथास्थित मदत येऊन पोहोंचल्यावर राजानें बंडखोरांचा पराभव करून त्यांना वठणीस आणलें; आणि आपल्या सैन्यासहवर्तमान तो वाराणसीला गेला. तेथें त्यानें नगरद्वारपाळांला बोलावून आणून असें सांगितलें कीं, ''जर एखादा शेतकरी येऊन तुम्हाला थोरल्या घोडेस्वाराचे घर विचारील तर त्याला थेट माझ्या घरीं घेऊन या.''
« PreviousChapter ListNext »