Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 133

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
राजानें तो धोतरजोडा फाडून त्यांतील एक धोतर परिधान केलें, आणि उपवस्त्रादाखल एक खांद्यावर घेतलें. तसेंच तें लुगडें आपल्या राणीला नेसावयास लावलें; आणि खाऊ थोडा आपण खाऊन देवाच्या प्रसादाप्रमाणें थोडाथोडा राजवाड्यांतील सर्व लोकांना वांटून दिला ! शेतकर्‍यानें आपली फिर्याद पुढें मांडल्यावर राजा म्हणाला, ''त्या वेळेला मी राजा आहे, असें सांगणें फार धोक्याचें होतें. म्हणून मी आपलें नांव गुप्‍त ठेविलें; आतां तुला मी खरी गोष्ट सांगतों कीं, मी थोरला घोडेस्वार नसून काशीराष्ट्राचा राजा आहे; केवळ तुला येथें आणण्यासाठींच तुझ्या गांवावर कर वाढविण्यांत आला आहे. परंतु हा कर वसूल करण्यांत येणार नाहीं. एवढेंच नव्हे तर, मूळचा कर जर वसूल करण्यांत आला असेल तर तोदेखील गांवकर्‍यांना परत करण्यांत येईल व यापुढें तुमच्या गांवावर कोणत्याही प्रकारें कर लादण्यांत येणार नाहीं. मात्र तूं या पुढें माझ्याच जवळ राहिलें पाहिजे.''

त्यावर शेतकरी म्हणाला, ''महाराज, आम्हां शेतकर्‍यांना राजवाड्यांत सुख कसें होईल ? आमची रोजची भाजी भाकरीच आम्हांला गोड लागते. तेव्हां मला माझ्या गांवीं जाऊन राहण्याची परवानगी द्या.''

राजानें मोठ्या गौरवानें त्या शेतकर्‍याला त्याच्या गांवी पाठवून दिलें. या यःकश्चित् मनुष्याचा झालेला गौरव पाहून पुष्कळ अमात्यांच्या पोटांत दुखूं लागलें. त्यांनीं युवराजाकडे अशी तक्रार केली कीं, राजा भलत्याच माणसाची पूजा करतो. तेव्हां तो लोकांस अप्रिय होईल. युवराजानें ही गोष्ट राजाजवळ काढिली तेव्हां तो म्हणाला, ''बाबारे, या माणसानें मला जीवदान दिलें आहे. त्याच्यावर मी थोडाबहुत उपकार केला असतां तुम्हा सर्वांना वाईट कां वाटावें ?''
« PreviousChapter ListNext »