Bookstruck

धर्म 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
४ पृथ्वीमंडळ

पृथ्वी, उदक, तेज इत्यादिकांची मंडळाकार आकृति डोळ्यांसमोर ठेवूनं तिचें चिंतन केलें असतां अर्पणासमाधि साधितां येते. ह्या मंडळांचें चिंतन सर्व प्रकारच्या मनुष्यांना हितकारक आहे.

ज्याला पृथ्वीमंडळावर ध्यान करावयाचें असेल त्यानें नांगरलेल्या जमिनींत किंवा जेथें गवत वगैरे उगवलें नसेल अशा ठिकाणीं जाऊन तेथें जमिनीचा वर्तुलाकार भाग डोळ्यांसमोर ठेवून त्यावर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. अशानें ध्यान साध्य होत नसेल तर एक वीत चार अंगुलें व्यासाचें अरूणवर्ण मृत्तिकेचें एक मंडल तयार करावें; व एकांतांत बसून त्याचें ध्यान करावें. उदक मंडळाचें ध्यान करणारानें वर्तुलाकृति तलाव, विहिरी इत्यादिकांवर ध्यान करावें. तेजोमंजळाचें ध्यान करणारास सूर्यमंडळ, चंद्रमंडळ किंवा दिव्याची ज्योति इत्यादिकांवर ध्यान करितां येतें. ह्या मंडळाच्या चिंतनानें अर्पणासमाधीची चारहि ध्यानें साध्य होतात.

समाधीला प्रतिबंधक गोष्टी.

वसतिस्थान, आसपासचा प्रदेश, संभाषण, सोबती, भोजन, ऋतु इत्यादि गोष्टी यथायोग्य नसल्यावर त्यांपासून समाधि साधण्याला वांरवार अडथळा येतो. ह्मणून दूरवर विचारानें अशा गोष्टींची योग्य निवड केली पाहिजे.

जेथून रम्य भूमिभाग दृष्टीस पडेल अशा उंचवट्याच्या, नदी किनार्‍याच्या किंवा समुद्र किनार्‍याच्या प्रदेशांत योग्याचें वसतिस्थान असणें समाधीला अनुकूल आहे. कार्ली, कान्हेरी वगैरे ठिकाणीं जीं भिक्षूंकरितां लेणीं कोरलीं आहेत त्याचें कारणहि हेंच असलें पाहिजे. वसतिस्थानाच्या आसपासचा प्रदेश चांगला असला पाहिजे. दारूबाज वगैरे दुराचारी लोकांचा किंवा सर्प व्याघ्रादि हिंस्त्र प्राण्यांचा योग्याच्या वसतिस्थानाच्या आसपास सुळसुळाट असेल तर त्यांपासुन वारंवार समाधीस अंतराय होणार आहे. योग्यानें अधार्मिक संभाषण अगदींच वर्ज्य केलें पाहिजे; व धार्मिक संभाषणांतहि परिमितता ठेवली पाहिजे. चंचल मनुष्याची सोबत योग्यानें आरंभीं मुळींच करितां कामा नये. त्यानें स्थिर आणि धर्मिक मनुष्याचीच संगति केली पाहिजे. भोजनाची निवड ज्याच्या त्याच्या तब्यतीवर अवलंबून आहे. जेणेंकरून अंगांत हुषारी राहील असें अन्न परिमितपणें आणि नियमितपणें सेवन केलें पाहिजे. योगारंभीं योग्याला मानवेल असाच ऋतु असावा लागतो. कोणाला उन्हाळा मानवतो, कोणास पावसाळा मानवतो व कोणास हिंवाळा मानवतो. ज्यानें त्यानें आपल्या अनुभवानें ही निवड करावी. एकंदरींत.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्रावबोधस्य योगो भवति दु:खहा।।


(ज्याचे आहारविहार बेताचे असतात, सर्व प्रसंगीं ज्याचे व्यापार नियमित असतात, तसेंच ज्याचें निजणें आणि जागणें बेताचें असतें अशा मनुष्याचा योग त्यच्या दुखाचा समूळ नाश करितो.) भगवद्रीतेंतील हा उपदेश बौद्ध मतास अनुसरूनच आहे.

« PreviousChapter ListNext »