Bookstruck

धर्म 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अधिप्रज्ञाशिक्षा किंवा प्रज्ञा,

सभ्यगृहस्थ हो, आतां बौद्धधर्ममार्गाची जी तिसरी पायरी अधिप्रज्ञाशिक्षा किंवा प्रज्ञा, तिचा आपण थोडक्यांत विचार करूं. प्रज्ञा दोन प्रकारची आहे. लौकिकप्रज्ञा आणि लोकोत्तरप्रज्ञा. जिच्या योगानें मनुष्य प्रपंचामध्यें अल्पप्रयासानें परोपकार करण्यास समर्थ होता किंवा खलांचा कावा चालूं देत नाहीं ती लौकिकप्रज्ञा होय. जातकग्रंथामध्यें गोष्टींच्या रूपानें तिचीं अनेक उदाहरणें सांपडतात. लोकोत्तरप्रज्ञा ह्मटली ह्मणजे चार आर्यसत्यें, प्रतीत्यसमुत्पाद इत्यादिकांचें यथार्थ ज्ञान होय. या लोकोत्तरप्रज्ञेलाच येथें अधिप्रज्ञाशिक्षा किंवा प्रज्ञा असें ह्मटलें आहे.

‘समाहितो यथाभूतं पस्सति,पजानाति’

(ज्याला समाधिलाभ झाला तोच यथार्थतया पाहतो व जाणतो.) या वचनानुरोधानें अधिचित्तशिक्षा पुरी झाल्यावर योग्यानें प्रज्ञालाभासाठीं प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या व्याख्यानांत सांगितलेल्या चार आर्यसत्यांचें-दु:ख, दु:खसमुदय, दु:खनिरोध व दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा(मार्ग) यांचें- योग्यानें प्रथमत: यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतलें पाहिजे. दु:ख हें सत्य केवळ परिज्ञेय ह्मणजे जाणण्यास योग्य आहे, दु:खसमुदय ह्मणजे तृष्णा ही त्याज्य आहे, दु:खनिरोध ह्मणजे निर्वाण हें ध्येय आहे, आणि दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा ह्मणजे आर्यअष्टांगिक मार्ग हें सत्य अभ्यसनीय आहे तेव्हां योग्यानें परिज्ञेय सत्य केवळ जाणावें, त्याज्याचा त्याग करावा, ध्येयाचा साक्षाक्तार करून घ्यावा, व अभ्यसनीयाचा अभ्यास करावा.

अविद्येपासून संस्कार, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति(जन्म), जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:खस दौर्मनस्य, उपायास उत्पन्न होतात. या कारण परंपरेला प्रतीत्यसमुत्पाद असें ह्मणतात. जरामरणाचें कारण जन्म, जन्माचें कारण भव ह्मणजे कर्म, कर्माचें कारण उपादान ह्मणजे लोभ, लोभांचें कारण तृष्णा, तृष्णेचें कारण वेदना ह्मणजे सुख, दु:ख, उपेक्षा या तीन अवस्था, वेदनांचें कारण स्पर्श ह्मणजे इंद्रिविषयसंयोग, स्पर्शाचें कराण षडायतन ह्मणजे मन आणि पांच ज्ञानेंद्रियें, षडायंतनाचें कारण नामरूप, नामरूपाचें कारण विज्ञान ह्मणजे जाणीव, विज्ञानाचें कारण संस्कार ह्मणजे प्रवृत्ती, संस्कारांचें कारण अविद्या ह्मणजे अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञानाचे बौद्धमताप्रमाणें संक्षेपत: तीन प्रकार आहेत. (१) जग अनित्य –ह्मणजे रूपांतर पावणारें- असतां तें नित्य आहे, असें मानणें.(२) आत्मा ह्मणून अविनाशी, अविकारी असा पदार्थ नसतां तो आहे असें मानणें.(३) संसार दु:खमय असतांना त्यांतच सर्व सुख आहे असें मानणें. या प्रकारचें अयथार्थ ज्ञान सर्व संसारदु:खाचें आद्यमूळ होय. चार आर्यसत्यांच्या ज्ञानानें या अविद्येचा नाश होतो; आणि अविद्येचा नाश झाला ह्मणजे तिच्यावर अवलंबून असलेल्या संस्कारांदिकांचा आपोआप नाश होतो. अविद्या उत्पन्न होण्यापूर्वीं पाण्यांची काय स्थिति होती हे कोणाच्यानेंहि सांगतां येणार नाहीं. हा सगळा संसार अनादि आहे, अर्थांत अविद्याहि अनादि आहे. बुद्ध भगवान् ह्मणतात:-
« PreviousChapter ListNext »