Bookstruck

आत्मवाद 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भगवान् म्हणाला, ''निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मीं होतां किंवा नव्हतां हें तुम्हास माहीत आहे काय?”

नि. आम्हांला माहीत नाही.

भ. बरें, पूर्वजन्मीं तुम्ही पाप केलें किंवा नाही हें तरी तुम्हांस माहीत आहे काय?

नि.- तेंही आम्हांस माहीत नाही.

भ. - आणि तें अमुक तमुक प्रकारचें पाप होतें हें तरी तुम्हांस माहीत आहे काय?

नि. – तें देखील आम्हांस माहीत नाही.

भ.- तुमच्या एवढया दु:खाचा नाश झाला, आणि एवढें बाकी आहे, हें तरी तुम्ही जाणतां काय?

नि.- तेंही आम्ही जाणत नाही.

भ.- ह्या गोष्टी जर तुम्हांला माहीत नाहीत, तर तुम्ही मागल्या जन्मीं पारध्यांसारखे क्रुरकर्मी होतां, आणि ह्या जन्मीं त्या पापांचा नाश करण्याकरीतां तपश्चर्या करतां, असें होणार नाही काय?

नि.- आयुष्मन् गोतम, सुखाने सुख प्राप्त होत नसते; दु:खानेच सुख प्राप्त होत असतें, सुखाने सुख प्राप्त झालें असतें, तर बिंबिसार राजाला आयुष्मान् गोतमापेक्षा अधिक सुख मिळाले असतें.

भ. - निर्ग्रंथहो, हें तुम्ही विचार न करतां बोललां. येथे मी तुम्हांला एवढें विचारतों की, बिंबिसार राजा सात दिवसपर्यंत सरळ बसून एकही शब्द न उच्चारतां एकांतसुख अनुभवूं शकेल काय? सात दिवस राहू द्या, एक दिवस तरी असे सुख अनुभवू शकेल काय?

'' आयुष्मन्, त्याला हें शक्य नाही,'' असें निर्ग्रंन्थानी उत्तर दिलें. तेव्हा भगवान् म्हणाला,'' मी एक दिवसच नव्हे, तर सात दिवस अशा तर्‍हेचें सुख अनुभवूं शकतों; आणि तुम्हांला विचारतों की, बिंबिसार राजा (आपल्या वैभवाने) अधिक सुखी की मी अधिक सुखी?''

नि. - असे आहे तर, आयुष्मन् गौतमच बिंबिसार राजाहून अधिक सुखी आहे.

बौध्द मताची विशेषता दाखविण्यासाठी हा संवाद रचला असला तरी जैन मताचा त्यांत विपर्यास केलेला नाही. तपश्चर्येच्या आणि चातूर्यामाच्या  अभ्यासाने पूर्व कर्माचा क्षय करतां येतो, असें त्यांचे म्हणणें होतें; आणि ती परंपरा अद्यापि कायम आहे.
« PreviousChapter ListNext »