Bookstruck

कर्मयोग 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
प्रकरण आठवें
कर्मयोग
बुध्द नास्तिक की आस्तिक ?

एके समयीं बुध्द भगवान् वैशालीजवळच महावनांत राहत होता. त्या वेळीं कांही प्रसिध्द लिच्छवी राजे आपल्या संस्थागारांत कांही कारणास्तव जमले असतां, बुध्दासंबधाने गोष्टी निघाल्या. त्यांतील बहुतेक बुध्दाची, धर्माची आणि संघाची स्तुति करूं लागले. ती ऐकून सिंह सेनापतीला बुध्ददर्शनाची इच्छा झाली. तो निर्ग्रंथांचा उपासक असल्यामुळे त्यांच्या मुख्य गुरूला -नाथपुत्ताला - भेटला, आणि म्हणाला,'भदन्त, मी श्रमण गोतमांची भेट घेऊं इच्छितों.''

नाथपुत्त म्हणाला,'सिंहा, तूं क्रियावादी असतां अक्रियवादी गोतमाची भेट कां घेऊं इच्छितोस?” हें आपल्या गुरूचें वचन ऐकून सिंह सेनापतीने बुध्ददर्शनाला जाण्याचा बेत सोडून दिला. पुन्हा एकदोनदा त्याने लिच्छवींच्या संस्थागारांत बुध्दाची, धर्माची आणि संघाची स्तुति ऐकली. तथापि नाथपुत्ताच्या सांगण्यावरून बुध्ददर्शनाला जाण्याचा बेत त्याला पुन्हा तहकूब करावा लागला. शेवटीं सिंहाने नाथपुत्ताला विचारल्यावाचूनच बुध्दाची भेट घेण्याचा निश्चय केला; व मोठया लवाजम्यासह महावनांत येऊंन तो भगवंन्ताला नमस्कार करून एका बाजूला बसला, आणि भगवन्ताला म्हणाला,'' भन्दत, आपण अक्रियवादी आहांत व अक्रियवाद श्रावकांना शिकवितां, हें खरें काय,''

भगवान् म्हणाला, ''असा एक पर्याय आहे की, ज्याच्या योगें सत्यवादी मनुष्य म्हणूं शकेल, श्रमण गोतम अक्रियवादी आहे. तो पर्यांय कोणता ? हे सिंहा, मी कायदुश्चरिताची, वागदुश्चरिताची व मनादुश्चरिताची आक्रिया उपदेशितों.

''सिंहा, दुसराही एक पर्याय आहे की, ज्याच्यामुळे सत्यवादी मनुष्य म्हणूं शकेल, श्रमण गोतम क्रियावादी आहे. तो कोणता? मी कायसुचरिताची, वाक्सुचरिताची आणि मन:सुचरिताची क्रिया उपदेशितों.

'' आणखी असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला उच्छेदवादी म्हणूं शकेल. तो कोणता? सिंहा, मी लोभ, द्वेष, मोह इत्यादि सर्व पापकारक मनोवृत्तींचा उच्छेद उपदेशितों.

'' असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला जुगुप्सी म्हणूं शकेल. तो कोणता ? सिंहा, मी कायदुश्चरिताची, वाग्दुश्चरिताची आणि मनोदुश्चरिताची जुगुप्सा (कंटाळा) करतों. पापकारक कर्मांचा मला वीट आहे.

''असाही एक पर्याय आहे की ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला विनाशक म्हणूं शकेल. तो कोणता? लोभाचा, द्वेषाचा आणि मोहाचा मी विनाश उपदेशितों.

'' आणि सिंहा, असा देखील एक पर्याय आहे की ज्याच्या योगें सत्यवादी मनुष्य मला तपस्वी म्हणूं शकेल. तो कोणता? हे सिंहा, पापकारक अकुशल धर्म तापवून सोडावे असें मी म्हणतों. ज्याचे पापकारक अकुशल धर्म वितळून गेले, नष्ट झाले, पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, त्याला मी तपस्वी म्हणतो.''
« PreviousChapter ListNext »