Bookstruck

कर्मयोग 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
नास्तिकतेचा आरोप

या सुत्तांत बुध्दावर मुख्य आरोप अक्रियावादाचा केलेला आहे. तो खुद्द महावीर स्वामींनी केला असेल किंवा नसेल. तथापि त्या वेळीं अशा प्रकारचा आरोप बुध्दावर करण्यांत येत असे, यांत शंका नाही.

गोतम क्षत्रिय कुलांत जन्मला. शाक्य क्षत्रियांचे शेजारी आणि आप्त कोलिय क्षत्रिय. या दोघांमध्यें रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने वारंवार मारामार्‍या होत, हें वर सांगितलेंच आहे (पूर्वाध, पृ.१०५) दुसर्‍या एखाद्या टोळीने आपल्या टोळींतील माणसांचे नुकसान केलें किंवा खून केला, तर त्याचा मोबदला त्या टोळींतील माणसाचें नुकसान करून किंवा खून करून घेण्याची पध्दति आजला सरहद्दीवरील पठाण लोकांत चालू आहे; तशीच ती प्राचीन काळीं हिंदुस्थानांतील क्षत्रियांत असली, तर त्यांत आश्चर्य मानन्याजोगें काही नाही. खरें आश्चर्य हें की, या क्षत्रियांच्या एका टोळींत जन्मलेल्या गोतमाने आपल्या शेजार्‍याचा आणि आप्तांचा सूड उगवणें साफ नाकारलें, आणि एकदम तपस्वी लोकांत प्रवेश केला.

गृहस्थाश्रमाचा कंटाळा आला, तर त्या काळचे ब्राह्मण आणि क्षत्रिय गृहत्याग करून परिव्राजक बनत, आणि खडतर तपश्चर्या

करीत. तेव्हा गोतम तपस्वी झाला, यांत कोणालाही विशेष वाटलें नसावें. फार झालें तर हा तरूण गृहस्थ स्वाश्रमाला निरूपयोगी ठरला, असें लोकांनी म्हटलें असले. पण जेव्हा सात वर्षे तपश्चर्या करून गोतम बोधिसत्व बुध्द झाला, आणि गृहस्थाश्रमांतील चैनींचा व संन्यासाश्रमांतील तपश्चर्येचा सारखाच निषेध करूं लागला, तेव्हा त्याच्यावर टीका होऊं लागल्या.

ब्राह्मणांना चालू समाजपध्दति पाहिजे होती. त्यांचा कर्मयोग म्हटला म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञयाग करावे, क्षत्रियांनी युध्द करावें, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी. हा कर्मयोग ज्याला पसंत नसेल त्याने अरण्यवास पत्करून तपश्चर्येच्या योगाने आत्मबोध करून घ्यावा, आणि मरून जावें; समाजाची घडी बिघडेल असें कोणतेंही कृत्यं करूं नये.

निरनिराळया श्रमणसंघात भिन्न भिन्न तत्वज्ञानें प्रतिपादिलीं जात असत; तथापि तपश्चर्येच्या संबंधाने त्यांपैकी अधिकतर श्रमणांची एकवाक्यता होती. त्यांत निर्ग्रंन्थांनी कर्माला विशेष महत्व दिलें. हा जन्म दु:खकारक आहे, आणि तो पूर्वजन्मींच्या पापकर्मांनी आला असल्यामुळे तीं पापें नष्ट करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली पाहीजे, असें त्यांचे पुढारी प्रतिपादीत. आणि बुध्द तर तपश्चर्येचा निषेध करणारा. तेव्हा त्याला निर्ग्रंथांनी अक्रियवादी(अकर्मवादी) म्हणणें अगदी साहजिक होतें. ब्राह्मणांच्या दृष्टीने बुध्दाने शस्त्रत्याग केला, म्हणून तो अक्रियवादी ठरतो! तर तपस्व्यांच्या दृष्टिने तपश्चर्या सोडली म्हणून अक्रियवादी ठरतो.
« PreviousChapter ListNext »