Bookstruck

कर्मयोग 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भगवान् कोसल देशांत प्रवास करीत शालवतिका नांवाच्या गावाजवळ आला. तो गाव पसेनदि कोसलराजाने लोहित्य ब्राह्मणाला इनाम दिला होता. लोहित्य असें एक पापकारक मत प्रतिपादन करी की, 'जर एखाद्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला कुशल तत्त्वाचा बोध झाला, तर तो त्याने दुसर्‍याला सांगू नये; एक मनुष्य दुसर्‍याला काय करूं शकणार? तो दुसर्‍याचें जुनें बंधन तोडून त्याला हें नवें बंधन उत्पन्न करील; यास्तव हें लोभी वर्तन असें मी म्हणतों.

भगवान् आपल्या गावाजवळ आल्याचें वर्तमान जेव्हा लोहित्य ब्राह्मणाला समजलें, तेव्हा रोसिका नांवाच्या न्हाव्याला पाठवून

त्याने भगवंताला आमंत्रण दिलें; आणि दुसर्‍या दिवशीं जेवण करून त्याच न्हाव्याकडून जेवण तयार असल्याचें वर्तमान भगवंताला आणि भिक्षुसंघाला कळविलें. भगवान् आपलें पात्र आणि चीवर घेऊन लोहित्य ब्राह्मणाच्या घरीं येण्यास निघाला. वाटेंत रोसिका न्हाव्याने लोहित्य ब्राह्मणाचें मत भगवंताला सांगितले; आणि तो म्हणाला, ''भदन्त, ह्या पापकारक मतापासून लोहित्याची सुटका करा.''

लोहित्याने भगवंताला आणि भिक्षुसंघाला आदरपूर्वक भोजन दिलें. भोजनोत्तर भगवान् त्याला म्हणाला, ''हे लोहित्य, एखाद्याला कुशल तत्त्वांचा बोध झाला, तर तो त्याने इतरांना सांगूं नये, असें तूं प्रतिपादन करतोस काय?''

लो.- होय, भो गोतम.

भ.- हे लोहित्य, तूं ह्या शालवतिका गावात राहत आहेस. आता कोणी असे म्हणेल की, ह्या शालवतिका गांवाचें जेवढें उत्पन्न आहे, तें सर्व एकटया लोहित्यानेच उपभोगावें, दुसर्‍या कोणालाही देऊं नये. असे बोलणारा तुझ्यावर अवलंबून असणार्‍या (ह्या गावच्या) लोकांचे अकल्याण करणारा होणार नाही काय?''

लोहित्याने 'होईल' असें उत्तर दिल्यावर भगवान् म्हणाला, ''जो इतरांना अंतराय करणारा होणार नाही काय?''
लोहित्याने 'होईल' असे उत्तर दिल्यावर भगवान् म्हणाला, ''जो इतरांना अंतराय करणारा तो त्यांचा हितानुकंपी होईल की अहितानुकंपी?''

लो.- अहितानुकंपी, भो गोतम.

भ.- अशा माणसाचें मन मैत्रीमय असेल की, वैरमय असेल?

लो. - वैरमय, भो गोतम.

भ.- वैरमय चित्त असलेला माणूस मिथ्याद्दष्टि होईल की, सम्यदृष्टि?

लो. - मिथ्याद्दष्टि, भो गोतम.
« PreviousChapter ListNext »