Bookstruck

कर्मयोग 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कुशल कर्माने अकुशलावर जय मिळवावा

येथे आणि दुसर्‍या अनेक ठिकाणीं बुध्द भगवंताचें म्हणणें असें की, चालत आलेल्या अकुशल रूढीविरूध्द कुशल विचार सुचला तर तो लोकांत प्रचलित करणें हें सज्जन मनुष्याचें श्रेष्ठ कर्तव्य होय; वाईट कर्मे आचरणार्‍याला कांही एक न बोलतां किंवा आपण त्याच्यासारखेच वागून तीं तशीच आचरूं देणे हें कर्तव्य नव्हे.

ब्राह्मणांचे म्हणणें होतें की, यज्ञयाग आणि वर्णव्यवस्था प्रजापतीनेच उत्पन्न केली असल्यामुळे त्यांना अनुसरून घडणारीं कर्मे पवित्र होत. परंतु भगवान् बुध्दाचें म्हणणे हें की, तृष्णेपासून उत्पन्न झालेलीं हिंसादिक कर्मे कधीही शुध्द होऊं शकत नाहीत. त्यांमुळे मनुष्य विषम मार्गांत बध्द झाला आहे आणि त्या कर्माविरूध्द कुशल कर्मे आचरल्यानेच त्याची ह्या विषम मार्गापासून सुटका होईल. मज्झिमनिकायांतील सल्लेख सुत्तांत (नं ८) भगवान् म्हणतो, 'हे चुन्द, दुसरे हिसंक वृत्तीने वागतात तेथे आपण अहिंसक होऊं या, अशी सफाई* (* शंख वगैरे पदार्थ घासून साफ करतात, त्याला सल्लेख म्हणतात. या ठिकाणी आत्मशुध्दीला सफाई म्हटलें आहे.) करावी. दुसरे प्राणघात करतात तर आपण प्राणघातापासून निवृत होऊं या, अशी सफाई करावी. दुसरे चोर होतात तर आपण चोरीपासून निवृत्त होऊं या, दुसरे अब्रह्मचारी, तर आपण ब्रह्मचारी होऊं या, दुसरे खोटे बोलतात, तर आपण खोटे बोलण्यापासून निवृत्त होऊं या दुसरे चहाडी करतात तर आपण चहाडी पासून निवृत्त होऊं या, दुसरे शिवीगाळ करतात तर आपण शिवीगाळीपासून निवृत्त होऊं या, दुसरे वृथालाप (बडबड) करतात तर आपण वृथालापापासून निवृत्त होऊं या, दुसरे परकीय धनाचा लोभ धरतात तर आपण परकीय धनाच्या लोभापासून मुक्त होऊं या, दुसरे द्वेष करतात तर आपण द्वेषापासून मुक्त होऊं या, दुसरे मिथ्याद्दष्टि आहेत, तर आपण सम्यकदृष्टि होऊं या, अशी सफाई करावी....

''हे चुन्द, एखाद्या विषम मार्गांत सापडलेल्या माणसाला त्यांतून बाहेर पडण्यासाठी सरळ मार्ग सापडावा त्याप्रमाणे विहिंसक माणसाला विंहिंसेपासून बाहेर निघण्याला अविहिंसा आहे. प्राणघाती माणसाला मुक्त होण्याला प्राणघातापासून विरति, चोराला मुक्त होण्याला चोरीपासून विरति, अब्रह्मचार्‍याला मुक्त होण्याला अब्रह्मचर्यापासून विरति, लबाडाला मुक्त होण्याला लबाडीपासून विरति, चहाडखोराला मुक्त होण्याला चहाडीपासून विरति, कर्कश वचन बोलणार्‍याला मुक्त होण्यास कर्कश वचनापासून विरति, आणि वृथाप्रलाप करणार्‍याला मुक्त होण्याला वृथालापापासून विरति, हाच उपाय आहे....

'' हे चुन्द, जो स्वत: गंभीर पंकांत रूतलेला आहे, तो दुसर्‍याला त्या चिखलांतून वर काढील हें शक्य नाही. त्याचप्रमाणे ज्याने स्वत:चें दमन केले नाही, स्वत:ला शिस्त लावून घेतली नाही, जो स्वत: शान्त नाही, तो दुसर्‍याला शांत करील, हें संभवत नाही. पण जो स्वत: दान्त नाही, विनीत आणि परिनिर्वृत असेल, तोच दुसर्‍याचें दमन करील, दुसर्‍याला विनय शिकवील आणि दुसर्‍याला परिनिर्वृत (शान्त) करील हें संभवनीय आहे.''

हाच अर्थ धम्मपादाच्या एका गाथेंत संक्षेपाने निर्देशिला आहे. ती गाथा ही -

अक्कोधेन जिने कोंध असाधुं साधुना जिने।
जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं ॥

'क्षमेने क्रोधाला जिंकावे, असाधूला साधुत्वाने जिंकावे, कृपणाला दानाने जिंकावें व लबाडाला सत्याने जिंकावे (धम्मपद २२३)
« PreviousChapter ListNext »