Bookstruck

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१७१. “आतां तुम्ही म्हणतां कीं, आम्ही तुमच्या लोकसंग्रहाचा विपर्यास केला. पण तुमच्या विहारांना जीं मोठमोठालीं इनामें आहेत, त्यांत काबाडकष्ट करणार्‍या शूद्रांना तुम्ही समानात्मतेनें वागवण्याला कबूल अहांत काय? त्यांना तुम्ही कधीं दान दिलें आहे काय? त्यांच्यांशीं कधीं गोड बोललां अहांत काय?  किंवा तुम्ही त्यांच्या हिताची काळजी घेतली आहे काय? इतकेंच नव्हे, ते जर तुमची सेवा करण्यासाठीं कांकूं करूं लागले, तर तुम्ही अहिंसाधर्मावर अवलंबून न रहातां राजदंडाचा आश्रय घ्याल. तेव्हां आम्ही जो येथें लोकसंग्रह दाखवून दिला आहे, तोच योग्य आहे.

१७२. “हें पहा, “विद्याविनययुक्त ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ या सर्वांच्या ठिकाणीं पंडिताची दृष्टि समान असते. ज्यांच्या मनामध्यें समता उत्पन्न झाली त्यांनी इहलोकींच संसार जिंकला. कारण ब्रह्म निर्दोष व सम आहे; आणि म्हणूनच ते ब्रह्माच्या ठायीं स्थिर झाले.’ हा आमचा समानात्मभाव तुमच्या समानात्मतेपेक्षां श्रेष्ठ नाहीं काय? तुम्हाला समानात्मता आणण्यासाठीं सर्व जगांत एकच जात उत्पन्न करावी लागेल; आणि तें तर अशक्य आहे. पण अशा तर्‍हेनें हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांमध्यें समतेनें पाहिलें कीं, समानात्मता सिद्ध झाली नाहीं काय? तुम्ही याच्यापेक्षां अधिक तें काय करूं शकतां?

१७३. “दुसराहि आम्ही एक समानतेचा अर्थ केला आहे तो पहा. ‘हे धनंजया, कर्मफळाची आसक्ति सोडून यशापयशाविषयीं सारखी बुद्धि ठेवून योगयुक्त होत्साता कर्में कर. अशा समत्वालाच योग म्हणतात. (अ.२ श्लोक ४८).’ राजांना तर हें समत्व पाहिजेच आहे. कां कीं, युद्धांत जय होईलच असें कोणी सांगूं शकत नाहीं. पण तुम्हा-आम्हालाहि अशा तर्‍हेचें समत्व हवें आहे. युद्धांत जय मिळवून राजा सिंहासनारूढ झाल्यावर तुम्ही-आम्ही त्याजपाशीं याचनेसाठीं जातों. पण तो सर्वदा कांहीं देतोच असें नाहीं; कधीं तुमच्या विहाराला दान देतो, तर कधीं आमच्या देवळाला देतो. परंतु सिद्धि आणि असिद्धि यांचा विचार न करतां आम्हाला त्याजपाशीं गेलें पाहिजे. मिळालें तरी वाहवा, नाहीं मिळालें तरी वाहवा, अशी बुद्धि धरली पाहिजे. याला आम्ही योग म्हटलें आहे. हा योग तुम्हाला पटतो कीं नाहीं?”

१७४. तात्पर्य, ब्राह्मण काय कीं श्रमण काय, दोघेहि एकाच पायरीवर उतरले होते. दोघांनाहि राजांकडून इनामें मिळवावयांची होतीं. त्यांत फरक एवढाच होती कीं, तुझ्या भाऊंबंदांना मारून तूं राज्य सम्पादन कर, असें श्रमण सांगूं शकले नसते. पण सर्व भाऊबंदांना मारून एकादा राजपुत्र राजा झाल्याबरोबर त्याला घेरून इनामें मिळवण्यांत त्यांची शर्यंतच लागत असे. अर्थात् त्यानें केलेल्या घातपातादि पूर्वकृत्यांना ते आपल्या आचरणानें एक प्रकारची संमति देतच. एवढेंच नव्हे, तर आपल्या मठाला पुष्कळ दानधर्म मिळाला असतां अशा राजाला ते धार्मिकतेच्या शिखरावर चढवीत. यापेक्षां ब्राह्मणांचा उद्योग बरा होता. ते राजाला भगवद्‍गीतेसारखे ग्रन्थ लिहून युद्धाला प्रवृत्त करीत. जर त्याचा लढाईंत नाश झाला, तर दुसर्‍या राजाचा आश्रय धरीत; पण जर जय झाला, तर त्याच राजाकडून इनामें मिळवीत. निदान युद्धाच्या पूर्वीं व पश्चात् ते उपस्थित होत. पण युद्ध संपेपर्यन्त श्रमणांचा पत्ता नसावयाचा; व राजा जेव्हां राज्याभिषिक्त होई तेव्हां मात्र आपल्या मठांना इनामें मिळवण्यासाठीं ते उपस्थित व्हावयाचें !
« PreviousChapter ListNext »