Bookstruck

भाग ३ रा 78

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
७३
कातियानी

“ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवणार्‍या उपासिकांत कातियानी श्रेष्ठ आहे.”

ही अवंती राष्ट्रांत कुररघर शहरांत जन्मली, व तेथेंच ती रहात असे. वयांत आल्यावर तिची आणि सोण कुटिकर्णाची आई काळी उपासिका हिची दृढ मैत्री जडली. कुररघराहून सोण श्रावस्तीला गेला, व तेथून भगवंताचा धर्म उत्तमप्रकारें शिकून परत आला; तेव्हां काळीनें त्याला आपल्या घरीं उपदेश करण्यास बोलाविलें. त्याचा उपदेश ऐकण्यास पुष्कळ लोक आले होते. त्यांत कातियानीहि होती.

कातियानीच्या घरीं दरवडा घालण्यासाठीं शहराच्या भिंतीबाहेरून चोरांनीं भुयार खणण्यास आरंभ केला होता, व तें त्याच रात्रीं पुरें झालें. चोरांच्या पुढार्‍यानें शेजारीं चाललेला धर्मोपदेश ऐकला, आणि तेथें जाऊन तो कातियानीच्या मागें उभा राहिला. त्याच वेळीं दिव्यासाठीं तेल आणण्यास कातियानीनें आपल्या दासीस घरीं पाठविलें. ती दासी तेल न घेतांच, चोर आल्याची बातमी घेऊन आली. त्या वेळीं चोरांच्या पुढार्‍यानें असा विचार केला कीं, जर ह्या गडबडीनें कातियानी येथून उठून जाऊं लागली, तर तिचे येथल्या येथेंच दोन तुकडे करीन. पण कातियानी दासीला म्हणाली, “अग, गडबड करूं नकोस. चोरांच्या हाताला लागेल तें चोर घेऊन जातील. पण मी जो आज उपदेश ऐकत आहें, तो कोणाच्या हाताला लागण्यासारखा नाहीं. अशा कामीं तूं विघ्न करूं नकोस.”

तिचें हें भाषण ऐकून चोरांचा पुढारी अत्यंत खजील झाला, व आपल्या मनाशींच म्हणाला, “अशा बाईच्या घरीं दरवडा घालणार्‍या आम्हांला ह्या महापृथ्वीनें दुभंग होऊन आपल्या पोटांत गडप करून टाकणेंच योग्य होईल.” तो तडक कातियानीच्या घरीं गेला व आपल्या साथ्यांना तिची चीजवस्तू जागच्या जागीं ठेवण्यास लावून त्यांना घेऊन काळीच्या घरीं आला. ते सर्व चोर तेथें जमलेल्या लोकांच्या मागें उभे राहिले होते. जेव्हां उपदेश संपला, तेव्हां कातियानीच्या पायां पडून त्या पुढार्‍यानें आपणास व आपल्या साथ्यांस क्षमा करण्यास विनंती केली. ‘तो क्षमा कां मागतो,’ हें कातियानीला समजेना. ती म्हणाली, “तुम्हीं माझा कोणता अपराध केलात?” त्यानें घडलेलें सर्व वर्तमान तिला सांगितलें. तेव्हां तिनें त्यांच्या अपराधांची क्षमा केली. पण तेवढ्यानें त्यांचें समाधान झालें नाहीं. तिच्याच मार्फत आपणांला प्रव्रज्या देण्यासाठीं त्यांनी सोणाला विनंति केली, व ते सर्व भिक्षु झाले.

७४
नकुलमाता गृहपत्‍नी

“दुसर्‍याचें समाधान करणार्‍या उपासिकांत नकुलमाता गृहपत्‍नी श्रेष्ठ आहे.”

हिची सर्व गोष्ट नकुलपित्याच्या गोष्टींत (प्र.६५) आलीच आहे. ती तेथें पहावी.
« PreviousChapter ListNext »