Bookstruck

भाग ३ रा 79

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
७५
काळी उपासिका कुररघरिका

“केवळ ऐकून (न भेटतां) भक्त झालेल्या उपासिकांत काळी श्रेष्ठ आहे.”

ही राजगृह येथें एका चांगल्या कुळांत जन्मली. तिचें लग्न अवंती राष्ट्रांतील कुररघर शहरीं एका कुटुंबांत झालें होतें. गरोदरावस्थेंत असतांना ती माहेरी आली व तेथेंच तिनें प्रथमतः भगवंताची कीर्ति ऐकली. आणि तेव्हांपासून ती उपासिका झाली. तिला जो मुलगा झाला, त्याचें नांव सोण असें ठेवलें होतें. त्याची कथा ह्या भागाच्या सतराव्या प्रकरणांत आलीच आहे. भगवंताची कीर्ति तिनें सातागिर व हेमवत ह्या दोन यक्षांच्या संवादावरून ऐकली, असें मनोरथपूरणींत म्हटलें आहे. कांहीं कां असेना, भगवंताचें दर्शन झाल्यावांचून इतरांकडून त्याची कीर्ति आणि धर्मोपदेश ऐकून ही उपासिका झाली, एवढी गोष्ट खरी आहे.                

[बुद्धाच्या भिक्षुसंघांत अंत्यज जातीचेही भिक्षु असत. पण त्यांपैकीं कोणाचाहि वरील यादींत समावेश झालेला नाहीं. म्हणून नमुन्यादाखल सोपाक (श्वपाक) व सुनीत ह्या दोन अंत्यज जातीच्या स्थविरांची चरित्रें थेरगाथा-अट्ठकथेच्या आधारें येथें देतों.]

७६
सोपाक (श्वपाक)

हा राजगृहांत श्वपाककुळांत जन्मला व त्याच नांवानें पुढें प्रसिद्धीला आला. चार महिन्यांचा असतांनाच त्याचा बाप मरण पावला, व त्याच्या पालनपोषणाचा भार त्याच्या चुलत्यावर पडला. तो सात वर्षांचा झाला तेव्हां ‘हा आपल्या मुलांबरोबर भांडत असतो,’ असें म्हणून त्याच्या चुलत्यानें त्याला स्मशानांत नेलें, व त्याचे दोन्ही हात पाठीशी बांधून त्याच दोरीनें त्याला तेथें पडलेल्या एका प्रेताशीं जखडून टाकलें. आणि ‘कोल्हे ह्याला खावोत’ असें म्हणून तो तेथून निघून गेला. तेव्हां सोपाक, ‘माझी येथें गति काय होणार, माझा येथें बांधव कोण, मला ह्या भयापासून कोण तारील?’ असें म्हणून मोठमोठ्यानें आक्रोश करूं लागला. रात्रिसमयीं सोपाकाचा आक्रोश ऐकून भगवान् तेथें आला, व बंधनापासून मुक्त करून त्यानें त्याला आपणाबरोबर नेलें. सोपाकाच्या आईनें दिराला मुलाची प्रवृत्ति विचारली; पण त्यानें कांहीं दाद लागूं न दिल्यामुळें दुसर्‍या दिवशीं शोध करीत करीत ती भगवंतापाशीं आली, व तिनें आपल्या मुलाची बातमी विचारली. भगवंतानें तिला धर्मोपदेश केला. तो ऐकून ती स्त्रोतआपन्न झाली, व मुलाला विहारांत नेल्याबद्दल तिला वाईट न वाटतां आनंदच झाला. पुढें सोपाक अर्हत्पदाला पावला. थेर गाथेंत त्याच्या ज्या सात गाथा आहेत त्या अशाः-

दिस्वा पासादछायायं चंकमन्तं नरुत्तमं।
तत्थ नं उपसंकम्म वन्दिस्सं पुरिसुत्तमं।।१।।
एकंसं चीवरं कत्वा संहरित्वान पाणियो।
अनुचंकमिस्सं विरजं सब्बसत्तानमुत्तमं।।२।।
ततो पञ्हे अपुच्छि मं पञ्हानं कोविदो विदू।
अच्छम्भी च अभीतो च ब्याकासिं सत्थुनो अहं।।३।।
विसज्जितेसु पञ्हेसु अनुमोदि तथागतो।
भिक्खुसंघं विलोकेत्वा इममत्थं अभासथ।।४।।
लाभा अङ्मन मगधानं येसायं परिभुञ्जति।
चीवरं पिण्डपातञ्च पच्चयं सयनासनं।
पच्चुट्ठानञ्च सामीचिं, तेसं लाभा ति चब्रवी।।५।।
अज्जदग्गे मं सोपाक दस्सनायोपसंकम।
एसा चेव ते सोपाक भवतु उपसम्पदा।।६।।
जातिया सत्तवस्सोहं लद्धान उपसम्पदं।
धारेमि अन्तिमं देहं अहो धम्मसुधम्मता।।७।।
« PreviousChapter ListNext »