Bookstruck

प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
“बुद्धगुरू श्रावस्तीमध्ये अनाथपीडिकाच्या आरामात राहात असता मालुंक्यपुत्र नावाचा भिक्षू त्याजपाशी आला आणि त्याला नमस्कार करून एका बाजूला आसनावर बसला. नंतर मालुंक्यपुत्र भगवंताला म्हणाला, ‘भदंत, एकांतात बसलो असता माझ्या मनात असा विचार आला की, हे जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे? शरीर आणि आत्मा एक आहेत की भिन्न आहेत? मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे किंवा नाही? इत्यादी मुद्द्यांचे भगवंताने विवरण केले नाही. तेव्हा मी आपणांजवळ येऊन या मुद्द्यांसंबंधाने प्रश्न विचारीन. जर आपणांला या मुद्द्यांचा निकाल लावता येईल, तरच मी आपला शिष्य होईन. जर आपणांला या गोष्टी माहीत नसतील, तर त्या माहीत नाहीत असे म्हणणे हा सरळ मार्ग होय!’

बुद्ध म्हणाला, ‘मालुंक्यपुत्र, तू माझा शिष्य होशील तर या मुद्द्यांचे स्पष्टीकरण करून सांगेन, असे मी तुला कधी सांगितले होते काय?’

‘नाही भदंत’, मालुक्यपुत्राने उत्तर दिले.

‘बरे, तू तरी मला म्हणालास काय, की जर मला तुम्ही या सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण करून सांगाल, तरच मी तुमच्या भिक्षुसंघात येईन?’

‘नाही भदंत’, मालुंक्यपुत्र म्हणाला.

बुद्ध म्हणाला, ‘तर मग आता हे मुद्दे स्पष्ट करून सांगितल्याशिवाय मी तुमचा शिष्य होणार नाही. या म्हणण्यात अर्थ कोणता?’
‘मालुंक्यपुत्र, एखाद्या मनुष्याच्या अंगामध्ये बाणाचे विषारी शल्य शिरून तो तळमळत असता त्याचे आप्त-इष्ट शस्त्रक्रिया करणार्‍या वैद्याला बोलावून आणतील; परंतु तो रोगी त्या वैद्याला म्हणेल की, ‘हा बाण कोणी मारला? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता, वैश्य होता की शूद्र होता, काळा होता की गोरा होता, त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते, धनुष्याची दोरी कशाची होती इत्यादी सर्व गोष्टी जोपर्यंत तुम्ही मला समजावून देणार नाही, तोपर्यंत मी या शस्त्राला हात लावू देणार नाही. मालुंक्यपुत्र, अशा प्रसंगी त्या माणसाला या सर्व गोष्टी न समजताच मरण येईल. त्याचप्रमाणे जो असा हट्ट धरील की, मला हे जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे इत्यादी सर्व मुद्दे समजल्यावाचून मी ब्रह्मचर्याचा अभ्यास करणार नाही. तर त्याला हे मुद्दे समजल्यावाचून मरण येईल.’

‘हे मालुंक्यपुत्र, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, अशी दृष्टी असली आणि असा विश्वास असला, तथापि धार्मिक आचरणाला त्यापासून मदत होईल असे नाही. हे जग शाश्वत आहे असा विश्वास ठेविला, तरी जरा, मरण, शोक, परिदेवन यांजपासून मुक्तता होत आहे, असे नाही. त्याप्रमाणे शरीर आणि आत्मा एक आहे, शरीर आणि आत्मा भिन्न आहे, मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होतो, मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होत नाही इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेविला काय किंवा न ठेविला काय, जाती (जन्म), जरा, मरण, शोक, परिदेवन (चिंता), आहेतच आहेत! म्हणून हे मालुंक्यपुत्र, जग शाश्वत आहे, इत्यादी गोष्टींचे विवरण करण्याच्या भरीला मी पडलो नाही. का की, या गोष्टींच्या वादविवादाने ब्रह्मचर्याला कोणत्याही प्रकारे स्थैर्य येण्याचा संभव नाही. अशा वादाने वैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध व्हावयाचा नाही, शांती, प्रज्ञा, संबोध आणि निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाही.
« PreviousChapter ListNext »