Bookstruck

प्रस्तावना (लक्ष्मणशास्त्री जोशी) 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
‘पण मालुंक्यपुत्र, हे दु:ख आहे, हा दु:खाचा समुदय आहे, हा दु:खाचा निरोध आहे, आणि हा दु:खनिरोधाचा मार्ग आहे, हे मी स्पष्ट करून दाखविले आहे, का की, ही चार आर्यसत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत. यांजमुळे वैराग्य येते, पापाचा निरोध होतो, शांतीचा, प्रज्ञेचा, संबोधाचा आणि निर्वाणाचा लाभ होतो, म्हणून हे मालुंक्यपुत्र ज्या गोष्टींची मी चर्चा केली नाही त्या गोष्टींची चर्चा करू नका, व ज्या गोष्टींचे मी स्पष्टीकरण केले आहे त्या गोष्टी स्पष्टीकरणाला योग्य आहेत असे समजा.’
बुद्धगुरू असे बोलल्यावर मालुंक्यपुत्राने त्याच्या भाषणाचे अभिनंदन केले.”
धर्मानंद कोसंबी यांनी बहुतेक सर्वच लेखन मोकळ्या सरळ अस्सल मराठीत केले आहे. परंतु ह्या संदर्भात असे सांगावेसे वाटते, की अलीकडे गेल्या २०-२५ वर्षांत मराठी शैलीतील साधी अर्थवाहकता कमी होत चालली आहे. विशेषत: ललित साहित्यातील शैली नटवी, पसरट व गुंतागुंतीची बनत आहे. कवितांमध्ये याचा प्रत्यय अधिक येतो. प्रसन्नता, अर्थवाहकता हा दोष ठरेल की काय अशी भीती वाटत आहे. गूढ वा अव्यक्त अर्थ असलेली शैली साहित्य पदवीला भूषवू लागली आहे. याचे एक कारण असे की, विचार आणि प्रत्ययशीलता अर्थाला सरळ पोचेनाशी झाली आहेत. धर्मानंदांची लेखनशैली या अवनतीपासून वाचवील, अशी आशा वाटते.

वाई, दिनांक २ फेब्रुवारी १९७७                    लक्ष्मणशास्त्री जोशी

« PreviousChapter ListNext »