Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
संजयराजानें पुत्राला वनांतरीं पाठविण्याचें आश्वासन देऊन लोकसमूहाला आपापल्या घरीं जाण्यास हुकूम केला, व आपल्या मुख्य हुजर्‍याला बोलावून तो म्हणाला “तूं आतांच्या आतां वेस्संतराकडे जा, व शिबीची इच्छा काय आहे हें त्याला कळव.”

क्षत्ता (मुख्य हुजर्‍या) वेस्संतराच्या महालामध्यें गेला व म्हणाला “वेस्संतरमहाराज, तुमच्या मोठ्या अपराधानें सर्व शिबि संक्षुब्ध होऊन तुम्ही या क्षणाला राजधानींतून निघून जावें, असें म्हणत आहेत, आणि संजयराजाला त्यांचें म्हणणें कबूल करावें लागत आहे.” हें बोलत असतां क्षत्त्याचा कंठ दाटून येऊन त्याच्या डोळ्यांतून एकसारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. वेस्संतर शांत चित्तानें क्षत्त्याला म्हणाला “असा माझा कोणता अपराध आहे बरें, कीं, ज्याच्यायोगानें शिबि माझ्यावर इतके रागावले आहेत?”

क्षत्ता म्हणाला “आजपर्यंत तुम्हीं जो दानधर्म केलात, त्यामुळें प्रजेची तुमच्यावर इतराजी न होतां भक्ति वाढत गेली; परंतु जेव्हां तुम्हीं श्वेतगजाला याचकांनां देऊन टाकलें, तेव्हां त्यांच्या मनांतील तुमच्याविषयींची पूज्यबुद्धि चंडकोपानें ग्रासून टाकिली. तेव्हां आतां आपण तापसवेष स्वीकारून या राज्यांतून निघून जावें हें बरें.”

हें ऐकून वेस्संतरानें तपोवनांत जाण्याची सिद्धता केली.

एकदोन दिवसांत वेस्संतरानें आपली संपत्ति गरिबांनां वांटून दिली, आणि वंकपर्वतावर जाण्यासाठीं आपल्या मातापितरांची आज्ञा घेऊन तो आपल्या प्रियपत्नीच्या महालांत गेला. मद्दीला आपला पति वनांतरीं जाणार हें वर्तमान आगाऊच समजलें होतें, व त्यामुळें ती अत्यंत खिन्न झाली होती. वेस्संतराला पाहिल्याबरोबर तिचा शोक तिला आवरेनासा झाला. वेस्संतर म्हणाला “मद्दी, शिबीचा निश्चय तुला समजला आहे काय?”

“होय महाराज!” असें शोकाकुल स्वरानें मद्दीनें उत्तर दिल्यावर तो म्हणाला “प्रिये, तूं शोक करूं नकोस. तुझ्या वडिलांकडून मिळालेली संपत्ति व मजकडून तुला देण्यांत आलेली संपत्ति या सर्व संपत्तीचा तूं दानधर्मांत विनियोग कर. जालिकुमार व कण्हाजिनाकुमारी यांचें तूं उत्तम रीतीनें परिपालन करिशील, याबद्दल मला शंका नाहीं. या आमच्या आवडत्या मुलांवर लक्ष्य देऊन तूं माझ्या विरहानें होणारा शोक विसरून जा.”

मद्दी म्हणाली “महाराज, हा कांहीं पत्नीचा धर्म नव्हे. जेथें पति तेथेंच पत्नीनें रहावें, असें धर्म सांगतो. तेव्हां ज्या मार्गानें आपण जाल, त्याच मार्गानें मीहि जाईन. आपल्यासह वर्तमान रहात असतां मला मृत्यु आला तर मला मोठा आनंद होईल; परंतु आपला विरह होऊन जगणें मला मृत्यूहूनहि दु:खद होईल! मला वनवासानें त्रास होईल अशी आपण शंकादेखील मनामध्यें आणूं नका. जालिकुमार व कण्हाजिनाकुमारी तपोवनामध्यें आमच्या चित्तानें रंजन करतील, आणि आमच्या सहवासामुळें अरण्यवासाचा आपल्याला कंटाळा न येतां आपले दिवस सुखांत जातील, व आपली तपश्चर्या सफल होईल!”

मद्दीच्या आग्रहावरून वेस्संतरानें तिला व आपल्या दोन्ही मुलांनां बरोबर घेतलें. संजय राजानें आपल्या मुलाला, सुनेला व नातवांनां तपोवनांत पोहोंचविण्यासाठी रथ दिला; परंतु रस्त्यामध्यें वेस्संतराला याचकांनीं गांठून तोहि त्याच्यापासून घेतला. तेव्हां वेस्संतरानें जालीला कडेवर घेतलें आणि मद्दीनें कण्णाजिनेला कडेवर घेतलें, व उभयतांनीं पायांनींच पुढील मार्ग आक्रमण केला. वंकपर्वतावर पोहोंचल्यावर वेस्संतरानें आपणासाठीं एका रम्य स्थलीं सुंदर पर्णकुटी बांधली, आणि त्या ठिकाणीं तो आपल्या कुटुंबासहवर्तमान राहूं लागला.
« PreviousChapter ListNext »