Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
त्या काळीं कलिंगदेशामध्यें जूजक नांवाच्या ब्राह्मणानें भिक्षुकी वृत्तीवर शंभर कार्षापण मिळवून ते एका ओळखीच्या ब्राह्मणाच्या हवालीं केले व तो देशांतराला गेला. पुढें पुष्कळ वर्षेपर्यंत त्याचा पत्ता नव्हता. तेव्हां ज्याच्याजवळ त्याची ठेव होती, त्या गृहस्थानें ती सर्व आपत्कालांत खर्चून टाकिली. इतक्यांत जूजक येऊन आपली ठेव मागूं लागला; परंतु ठेव देण्याचें सामर्थ्य त्या गृहस्थाच्या अंगीं नसल्यामुळें तिच्याऐवजीं त्याची एक तरुण मुलगी जूजकाला देण्याचें ठरलें. त्याप्रमाणें जूजकाचें त्या मुलीबरोबर लग्न झाल्यावर तो तिला घेऊन आपल्या गांवीं गेला. जूजक जरी म्हातारा होता, तरी त्याच्या तरुण पत्नीला तो प्रिय होता. ती त्याची मोठ्या आदरानें सेवा करीत असे. तें पाहून गांवांतील सर्व लोक आपल्या बायकांनां म्हणत असत. कीं, “पहा, जूजक इतका म्हातारा आणि कुरूप असून देखील त्याची बायको त्याच्या सेवेंत तत्पर असते. ती कधीं त्याजवर रागावत नाहीं. नाहीं तर तुम्ही! एवढें तेवढें कांहीं कमी पडलें, कीं, आपल्या नवर्‍यांवर संतापतां. नवर्‍यांशीं भांडल्यावांचून तुमचा एक तरी दिवस जातो काय? त्या जूजकाच्या तरुण बायकोची तुम्हांला लाजच वाटावयाला पाहिजे!”

गांवांतील बायकांनां जूजकाची बायको अमित्रतापना आपली शत्रु आहे असें वाटावयाला लागलें, तर त्यांत नवल कसलें? त्यांनीं अमित्रतापनेला तेथून हांकून देण्याचा कट उभारला. जेव्हां अमित्रतापना पाण्यासाठीं नदीवर येत असे, तेव्हां ज्या त्या बाईनें तिला म्हणावें “कायग बाई! इचीं आईबापें मोठीं क्रूर असलीं पाहिजेत. नाहींतर त्यांनीं हिला जूजकासारख्या म्हातार्‍याला कशाला विकलें असतें?”

बिचार्‍या अमित्रतापनेनें आपल्या आईबापांची निंदा किती तरी सहन करावी? एके दिवशीं नदीवरून रडतरडत ती घरीं आली, आणि जूजकाला म्हणाली “मला जर तुम्ही एक दास आणि एक दासी आणून द्याल, तरच मी तुमच्या घरीं राहीन; नाहींतर मी आपल्या माहेरीं निघून जाईन.”

गरीब बिचारा जूजक आपल्या तरुण पत्नीच्या दरडावणीनें फार घाबरला. तो म्हणाला “मी गरीब ब्राह्मण; शास्त्रादिकांचेंहि ज्ञान मला नाहीं; तेव्हां तुझ्यासाठीं दास आणि दासी विकत आणणें मला कसें शक्य आहे? पण तूं कांहीं काळजी करूं नकोस. उद्यांपासून मीच नदीवर पाणी आणण्यासाठीं जाईन. म्हणजे तुझ्या वडिलांची निंदा ऐकण्याचा प्रसंग तुला येणार नाहीं.”

अमित्रतापना म्हणाली “तुम्हाला नदीवर पाठवून मी घरीं बसलें, तर आम्हां दोघांनां गांवांतील सर्व लोक हंसतील, व जे आजवर माझी पतिव्रता म्हणून स्तुति करीत आले, तेच मी पतीला कामाला लावतें व स्वत: स्वस्थ बसतें, अशी माझी निंदा करतील! आतां आपण गरीब आहों, हें मला कबूल आहे; तथापि निराश होण्याचें कांहीं कारण नाहीं. वेस्संतरराजाची ख्याति तुम्हीं ऐकलीच असेल. सध्यां तो आपल्या दोन मुलांसहवर्तमान वंकपर्वतावर पर्णकुटीमध्यें रहात आहे. तेथें जाऊन तुम्हीं त्याच्याजवळ याचना केली असतां तो आपलीं दोन्ही मुलें तुम्हाला देईल. त्यांनां तुम्ही दास आणि दासी करून माझ्या हवालीं करा, म्हणजे झालें.”
« PreviousChapter ListNext »