Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
जूजकाने पुष्कळ आढेवेढे घेतले; परंतु तरुण पत्नीच्या हुकुमापुढें बिचार्‍या वृद्ध जूजकाला आपली मान वांकवावी लागली. पाठीला शिदोरी बांधून व हातांत दंडकाष्ठ घेऊन जूजकानें वंकपर्वताचा रस्ता धरला. पर्वताच्या सन्निध आल्यावर अरण्यामध्यें त्याला एक व्याध भेटला. त्याच्याशीं त्यानें वेस्संतराच्या आश्रमाची चौकशी केली. तेव्हां तो व्याध चवताळून जूजकाला म्हणाला “तुझ्यासारख्या दुष्ट ब्राह्मणांनीं वेस्संतराला राज्यभ्रष्ट करून तपोवनाला पाठविलें. आतां पुन: त्याच्याशीं कशाची याचना करणार आहेस?”

जूजक चपापला, व म्हणाला “मला कशाचीहि याचना करावयाची नाहीं. संजयराजानें आपल्या मुलाच्या समाचारासाठीं मला पाठविलें आहे. वेस्संतराचा कुशलसमाचार विचारून तो त्याच्या बापाला कळविणें एवढेंच माझें काम आहे.”

तेव्हां तो व्याध संतुष्ट झाला व जूजकाचें आदरातिथ्य करून वेस्संतराच्या आश्रमाकडे जाणारा जवळचा रस्ता त्यानें त्याला दाखविला.

मद्दीदेवी आपल्या पतीला फलमूलादिक आणण्यासाठीं जाऊं देत नसे. सकाळच्या प्रहरीं आपण स्वत: जाऊन ती फलमूलादिक आहाराच्या वस्तु आणीत असे. वेस्संतर आश्रमांतच राहून आपल्या मुलांचा सांभाळ करी. मद्दीदेवी अरण्यांत गेली असतां जूजक वेस्संतराच्या आश्रमांत आला. वेस्संतरानें त्याचें योग्य आदरातिथ्य केलें, व इतक्या दूर येण्याचें कारण विचारलें.

जूजक म्हणाला “महाराज! आपल्या शुभ्र कीर्तीनें मला येथवर आणिलें आहे. मी वृद्ध ब्राह्मण. माझ्या तरुण पत्नीच्या मदतीला कुटुंबांत दुसरें माणूस नाही. तेव्हां तिचा आग्रह पडला, कीं, एक दास व एक दासी आणा. पण मी पडलों गरीब ब्राह्मण. दास आणि दासी विकत घेण्याला पैसे आणावे कोठून? तेव्हां आपल्यापाशीं धांव घेतली. आपण जर आपला हा मुलगा व मुलगी मला द्याल, तर माझें म्हातारपण सुखांत जाईल. आपण मोठे दानशूर आहां, तेव्हां माझ्यावर एवढा उपकार करण्यास डगमगणार नाहीं, अशी खात्री आहे.”

वेस्संतर म्हणाला “माझीं हीं दोन्ही मुलें आतांच्या आतांच मी तुम्हाला देतो; परंतु त्यांची आई येईपर्यंत तुम्हीं येथें थांबावें, अशी माझी विनंति आहे.”

जूजक म्हणाला “ ‘स्त्रीबुद्धि: प्रलयं गत:!’बायका म्हटल्या म्हणजे दानधर्माला विघ्न करणार्‍या पहिल्या प्रतीच्या. तेव्हां आपल्या पत्नीची वाट न पाहतां या क्षणींच या मुलांनां मला येथून घेऊन जाऊं द्या.”

वेस्संतर म्हणाला “जशी आपली मर्जी. तथापि आणखी एक विनंति केल्यावांचून माझ्यानें राहवत नाहीं. आपण या मुलांनां घेऊन माझ्या वडिलांजवळ जा. ते तुम्हांला अनेक दासदासी व पुष्कळ संपत्ति देऊन या मुलांनां तुम्हांपासून विकत घेतील. यांत तुमचा मोठा फायदा होईल.”
« PreviousChapter ListNext »