Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
हें ऐकून अनाथपिंडिक चकित झाला. कांकीं, जरी त्याचें खरें नांव सुदत्त हें होतें, तरी त्याच्या आप्तइष्टाशिवाय इतरांनां तें क्वचितच माहीत होतें. ‘अनाथपिंडिक’ या टोपणनांवानेंच तो प्रसिद्ध होता.

अनाथपिंडिक बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसला आणि म्हणाला “भगवन्, आपण रात्रीं सुखानें झोंपलांत ना?”

बुद्ध म्हणाला “जो ब्राह्मण कामसुखांत बद्ध होत नाहीं, ज्याच्या सर्व तृष्णा नष्ट झाल्या आहेत, व येणेंकरून ज्याचें मन शांत झालें आहे, तो सर्व काळ सुखानें झोंपतो.”

तद्नंतर बुद्धाने दानापासून फायदे, शीलापासून फायदे, स्वर्गलोकांतील सुख, कामोपभोगांत दोष आणि एकांतवासापासून फायदे इत्यादि गोष्टीसंबंधानें उपदेश केला, व जेव्हां अनाथपिंडिकाचें चित्त मृदु, मुदित आणि प्रसन्न झालेलें पाहिलें, तेव्हां त्याला त्यानें चार आर्यसत्यांचा उपदेश केला.

तो ऐकून बौद्धधर्माच्या सत्यतेबद्दल अनाथपिंडिकाची खात्री झाली. तो बुद्धाला म्हणाला “भगवन्! हा आपला धर्म अत्यंत सुंदर आहे. एकाद्या मनुष्यानें झांकलेली वस्तु उघड करून दाखवावी, किंवा डोळसांनां अंधारांत दिसावें म्हणून मशाल धरावी, त्याप्रमाणें आपण आपल्या धर्माचें उत्तम स्पष्टीकरण केलें आहे. मी आजपासून माझ्या कुडींत प्राण असेंपर्यंत आपणाला, आपल्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जात आहें. आपला उपासक आहें, या नात्यानें माझा आपण अंगीकार करावा. आतां उद्यां आपण भिक्षुसंघासहवर्तमान माझ्या अन्नदानाचें ग्रहण करावें.”

बुद्धानें कांहीएक न बोलतांच आमंत्रण पत्करल्याचे चिन्ह दाखविलें. तें जाणून अनाथपिंडिक आसनावरून उठला आणि बुद्धाला वंदन करून आपल्या मेहुण्याच्या घरीं गेला.

अनाथपिंडिकाचा मेहुणा (हा राजगृहक श्रेष्ठी या नांवाने प्रसिद्ध होता.) अनाथपिंडिकानें बुद्धाला आमंत्रण दिल्याचें वर्तमान ऐकून त्याला म्हणाला “तुम्ही या शहरांत परकी आहां, तेव्हां तुमच्यातर्फे उद्यांची सर्व सिद्धता मीच करितों.”

दुसरोहि पुष्कळ शेटसावकार अनाथपिंडिकाचे मित्र होते. त्यांनी देखील अनाथपिंडिकाला असाच आग्रह केला. खुद्द बिंबिसारराजानें अनाथपिंडिकाला बोलावून सांगितलें, कीं, “तुम्ही आमच्या शहरांत पाहुणे आहां, तेव्हां तुमच्यातर्फे उद्यां बुद्धाला आणि भिक्षुसंघाला आम्हीच अन्नदान देतों.”

परंतु अनाथपिंडिकाने मोठ्य़ा नम्रपणे कोणाचीहि मदत न स्वीकारतां मेहुण्याच्या घरी आपल्या नोकरचाकरांच्या साहाय्यानें सर्व तयारी स्वत: केली, व दुसर्‍या दिवशी मध्यान्हकालापूर्वी बुद्धाला आणि भिक्षुसंघाला बोलावून आणून आपल्या हातानें त्यांचे संतर्पण केलें.

भोजनोत्तर बुद्धाजवळ एका कमी दर्ज्याच्या आसनावर बसून अनाथपिंडिका म्हणाला “भगवन्, यंदाच्या चातुर्मास्यासाठीं आपण श्रावस्तीला यावें अशी माझी विनंति आहे.”

बुद्ध म्हणाला “हे गृहपति, तथागताला एकांतवासाचीच आवड असते.”

अनाथपिंडिक म्हणाला “होय, तें मी जाणत आहें!”

अनाथपिंडिकाचे राजगृह आणि श्रावस्ति या दोन शहरांच्या दरम्यान वाटेंतील गांवांत आणि लहानसान शहरांत पुष्कळ मित्र होते. श्रावस्तीला जात असतां ज्याज्या ठिकाणी त्यानें मुक्काम केला, त्यात्या ठिकाणीं आपल्या मित्रांनां बुद्धासाठीं रम्य प्रदेशांत विहार वगैरे बांधून बुद्धाच्या रहाण्याची सोय करण्याविषयीं त्यानें उपदेश केला; व श्रावस्तीला पोहोंचल्यावर बुद्धाला रहाण्याला योग्य स्थल तो पाहूं लागला.
« PreviousChapter ListNext »