Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कोसलदेशाच्या राजवंशांतील जेत नावाच्या राजकुमाराचें श्रावस्तीजवळ एक रमणीय उद्यान होते. अनाथपिंडिकाला या उद्यानाशिवाय दुसरी प्रशस्त जागा श्रावस्तीच्या आसपास सांपडली नाहीं. तेव्हां तो जेत राजकुमाराजवळ जाऊन त्याला म्हणाला “बुद्ध आमच्या शहरांत चातुर्मास्यासाठीं येणार आहेत. त्यांनां रहाण्याकरितां शहराच्या आसपास मीं पुष्कळ जागा पाहिल्या; परंतु आपल्या उद्यानाशिवाय मला एकाहि जागा पसंत पडली नाहीं. तेव्हां आपण मेहरबानी करून विहार बांधण्यासाठीं मला आपलें उद्यान द्यावें.”

जेत म्हणाला “हे गृहपति, सोन्याचें नाणें माझ्या उद्यानांत पसरलें, तर तेवढी किंमत घेऊन मी तुम्हाला माझें उद्यान देईन; एरवीं तें तुम्हाला मिळण्यासारखें नाहीं.”

जेताच्या म्हणण्याचा रोख असा होता, कीं, कितीहि किंमत दिली, तरी आपलें उद्यान विकण्याचा आपला उद्देश नाही; पण अनाथपिंडिकानें त्याचा शब्दश: अर्थ केला.

आपल्या घरी येऊन दोनचार सोन्याच्या नाण्यांच्या गाड्या भरून अनाथपिंडिकानें आपल्या नोकरांना जेताच्या उद्यानांत न्यावयाला लाविल्या व तें नाणे तेथें जमिनीवर पसरावयाला आरंभ केला. हें वर्तमान जेताला समजलें, तेव्हां तो तेथें आला व अनाथपिंडिकाला म्हणाला “तुम्हीं कितीही द्रव्य दिलें, तरी हें उद्यान मी तुम्हाला देणार नाहीं!”

अनाथपिंडिक म्हणाला “आपण राजकुलामध्यें जन्मलां आहां. तेव्हा आपलें वचन माघारें घेणें आपणाला लज्जास्पद होईल.”

जेत म्हणाला “माझ्या म्हणण्याचा उद्देश हा होता, कीं, जर तुम्ही सोनें पसरलें, तर देखील तेवढी किंमत घेऊन माझें उद्यान विकण्यास मी तयार नाही!”

त्या दोघांचाहि विवाद आपसांमध्ये तुटण्यासारखा नव्हता. तेव्हा त्यांनी आपलें म्हणणें श्रावस्तींतील न्यायाधीशमंडलासमोर मांडलें. सर्व न्यायाधीशांनी एकमतानें अनाथपिंडिकाच्याच तर्फे न्याय दिला. राजकुमारानें ज्याअर्थी सोन्याचें नाणें जमिनीवर पसरलें, तर तेवढी जमीन मिळेल असें म्हटलें, त्याअर्थी त्यानें आपल्या जमिनीची किंमत ठरविली असें म्हटले पाहिजे, व ही किंमत घेऊन त्यानें आपलें उद्यान अनाथपिंडिकाला दिलें पाहिजे, असा त्या न्यायाधीशांनी निवाडा केला.

इकडे सोन्याचें नाणें जेतवनामध्ये पसरण्याचें काम अनाथपिंडिकाच्या विश्वासु नोकरांनी पुढें चालविलेंच होतें. त्यांनी बराच भाग नाण्याने आच्छादिला. इतक्यांत जेत अनाथपिंडिकासह तेथे आला, आणि अनाथपिंडिकाला म्हणाला “एवढीच जमीन मी तुम्हाला विकत देतों. राहिलेली मी विहार बांधण्यासाठी दान देतों.”

अनाथपिंडिकानें असा विचार केला, कीं, जेतासारख्या राजकुमाराची बौद्धधर्माच्या प्रसाराला फार मदत होणार आहे. तेव्हां त्याच्या या देणगीचा अव्हेर करतां कामा नये. तो जेताला म्हणाला “ठीक आहे. या राहिलेल्या जमिनीमध्यें आपणाला बुद्धासाठी जें काहीं करावयाचें असेल तें खुशाल करा.”

जेतानें राहिलेल्या जागेंत एक कोठडी बांधिली व अनाथपिंडिकानें पुष्कळ कोठड्या, पुष्कळ चक्रमण, पुष्कळ भोजनशाळा, पुष्कळ विहार व पुष्कळ स्नानशाळा बांधिल्या.

बुद्धगुरू राजगृहांतून निघून भिक्षुसंघासह संचार करीतकरीत श्रावस्तीला आला. तेथें तो जेतवनामध्यें अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात असतां अनाथपिंडिकानें येऊन त्याला भिक्षुसंघासहवर्तमान आपल्या घरी आमंत्रण केलें.

दुसर्‍या दिवशी स्वत: बुद्धाला आणि भिक्षुसंघाला संतृप्त केल्यावर अनाथपिंडिकानें जेतवनविहाराची पुढें व्यवस्था काय करावी, असा बुद्धाला प्रश्न केला. बुद्ध म्हणाला “हे गृहपति, हा विहार तूं आगतानागत भिक्षुसंघाला दान दे.”

अनाथपिंडिकानें जेतवनाचें यथाविधि दान केलें; तेव्हां बुद्धानें त्याचें याप्रमाणे अभिनंदन केलें:- “विहारदान हें सर्वांत श्रेष्ठ आहे. कांकी, त्याच्यायोगें भिक्षूच्या ध्यानाला पाऊस, पाणी, ऊन, हिंसक पशु, वादळ इत्यादिकांपासून अंतराय होत नाही. म्हणून सुज्ञ उपासकानें यथाशक्ति विहार करवून तेथें विद्वान भिक्षुंनां राहण्याची सोय करावी, व त्यांनां यथाशक्ति अन्नदान द्यावें.”
« PreviousChapter ListNext »