Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
[१९]
शेतकरी भारद्वाज

एके समयीं बुद्धगुरू मगधराष्ट्रामध्यें एकनाळा नांवाच्या ब्राह्मणग्रामांत रहात होता. त्या वेळीं भारद्वाजब्राह्मणाच्या शेतांत नांगण्याचें काम चाललें होतें. त्यानें पांचशें नांगर या कामावर लाविले होते. एके दिवशीं शेत नांगरणार्‍या लोकांनां भारद्वाजब्राह्मणानें मेजवानी दिली. ती चालली असता बुद्धगुरू चीवर परिधान करून व आपलें भिक्षापात्र घेऊन तेथें जाऊन एका बाजूला उभा राहिला.

बुद्धाला भिक्षेसाठीं उभा राहिलेला पाहून भारद्वाज म्हणाला "हे श्रमण, मी नांगरतों, पेरतों, आणि माझा निर्वाह करितों. त्याप्रमाणें तूंहि शेती करून तुझा निर्वाह कर. भिक्षा मागण्यांत काय अर्थ आहे?"

बुद्ध म्हणाला "मी देखील शेतीवरच माझा निर्वाह करीत आहें."

ब्राह्मण म्हणाला "वा:! तूं आपणाला शेतकरी म्हणवितोस, पण आऊतें कोठें दिसत नाहीत तीं? तुझी शेती कशा प्रकारची आहे तें तरी सांग पाहूं."

बुद्ध म्हणाला "श्रद्धा हें बीं आहे. त्यावर सदाचरणाची वृष्टि होते. प्रज्ञा हा माझा नांगर आहे, व पापाची लाज हा त्या नांगराचा मधला दांडा होय. मनोरूपी रज्जूनें हा नांगर जखडलेला असतो. स्मृति हा माझ्या नांगराचा फाळ, आणि हाच माझा चाबूक होय. सत्य हेंच माझें बेणणें होय; आणि शांति ही माझी विश्रांति होय. माझा उत्साह हेच माझे बैल होत. माझें हें नांगरणें निर्वाणाच्या दिशेला जात असतें. याप्रमाणें केलेली शेती, हे भारद्वाज, अमृतफलद होत असते. अशा प्रकारची शेती केली असतां मनुष्य सर्व दु:खांपासून मुक्त होतो."

हें भाषण ऐकून भारद्वाजब्राह्मणानें मोठ्या ताटांतून दुधाची खीर आणिली आणि तो म्हणाला "भो गौतम, या पायसाचें आपण ग्रहण करा. महत्फलदायक शेती करणारे आपण शेतकरी आहां!"

बुद्ध म्हणाला "मीं आज तुझ्याशीं मला भिक्षा देण्यासंबंधानें ज्याअर्थी संवाद केला आहे, त्याअर्थी आज ही भिक्षा ग्रहण करणें मला योग्य नाहीं. तूं दुसर्‍या कोणातरी सत्पुरुषाला अन्नदानादिकानें संतुष्ट कर. कांकीं, साधुसंत हे पुण्याचीं शेतेंच आहेत."
« PreviousChapter ListNext »