Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
[२०]
संतापणारा भारद्वाज


एके समयीं बुद्धगुरू राजगृहांतील वेणुवनविहारांत रहात होता. आपल्या गोत्रांतील एक ब्राह्मण बुद्धाचा शिष्य झाला, हें वर्तमान ऐकून आक्रोशक भारद्वाजाला फार राग आला; आणि वेणुवनांत येऊन बुद्धावर त्यानें शिव्यांची लाखोली वाहिली. बुद्धानें कांहींच प्रत्युत्तर न दिल्यामुळें आक्रोशक भारद्वाज कांहीं वेळानें शांत झाला. तेव्हां बुद्ध त्याला म्हणाला "हे ब्राह्मण, तुझ्या घरीं कधींकधीं पाहुणे येत असतात काय?"

आक्रोशक भारद्वाज म्हणाला "होय. माझे सगेसोयरे कधींकधीं माझ्या घरीं येत असतात."

"आणि त्यांनां तूं खाण्यापिण्याचे जिन्नस देतोस ना?"

"होय. माझ्या घरीं पाहुणे आल्यावर मी त्यांचा योग्य आदरसत्कार करून खाण्यापिण्याचे जिन्नस त्यांनां देत असतों."

"पण हे ब्राह्मण, जर तुझ्या पाहुण्यांनीं तूं दिलेल्या जिनसांचा स्वीकार केला नाहीं, तर त्यांची काय वाट होते?"

"हे गौतम, हें तूं काय विचारतोस? मीं दिलेल्या जिनसा माझ्या पाहुण्यांनां आवडल्या नाहींत, तर त्या माझ्या मला परत मिळतात, हें उघडच आहे."

"हे ब्राह्मण, त्याचप्रमाणें तूं जी ही शिव्यांची भेट मजसाठीं आणलीस, तिचा मीं स्वीकार केला नाही. मी जर तुझ्यावर रागावलों असतों, किंवा तुला उलट शिव्या दिल्या असत्या, तर भेटीचा मीं अंगीकार केला असें ह्मणावें लागलें असतें. पण ज्याअर्थी मी स्वस्थ बसलों, त्याअर्थी त्यांचा अंगीकार मी केला नाहीं. आता तुझी ही भेट तुजपाशींच राहिली.’’

ब्राह्मण ह्मणाला, ``आपण मोठे संत आहां अशी आपली कीर्ति सर्वत्र पसरली आहे; पण आपण रागावतां हें कसें?’’

बुद्ध ह्मणाला, ``हे ब्राह्मणा, मी रागावलों नाही, हें उघडच आहे. रागावणारावर जो उलट रागावतो, त्याचेंच त्यायोगें उलट अहित होतें. पण जो कोणी परका मनुष्य रागावला असतां स्वत: संतापत नाहीं, तो मोठीच लढाई जिंकतो, असे म्हटलें पाहिजे. प्रतिपक्षी रागावला आहे असें पाहून जो मोठ्या विवेकाने शांत होतो, तो आपलें आण परक्याचें हित साधितो. आपला आणि दुसर्‍याचा रोग बरा करणार्‍या या मनुष्याला, सद्धर्माचें ज्यांनां ज्ञान नाही असें मूर्ख समजतात!’’

हें भाषण ऐकून आक्रोशक भारद्वाज बुद्धाला शरण गेला आण भिक्षु होऊन पुढे कांही कालानें अर्हत्पदाला पोहोंचला.
« PreviousChapter ListNext »