Bookstruck

दोन कोल्हे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्यांच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती योजली व ती लगेच अमलात आणली. खुराड्यात प्रवेश होताच कोंबड्या व त्यांची पिले यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला. त्या कोल्ह्यांपैकी एक कोल्हा तरुण व अविचारी होता. त्याचे मत असे झाले की, सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात. दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरविले की, काही कोंबड्या दुसर्‍या दिवसाकरता राखून ठेवाव्यात. तो तरुण कोल्ह्यास म्हणाला, 'मुला, मी अनुभवाने शहाणा झालो आहे अन् या जगात कितीतरी अकल्पित गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा आजच हा खाण्याचा साठा न संपवता त्याचा काही भाग शिल्लक ठेवावा हे चांगलं.' त्यावर तरुण कोल्हा म्हणाला, 'तू म्हणतोस ते खरे, पण माझा तर असा निश्चय आहे की, पुढल्या आठ दिवसांचं खाणं आजच एकदम खाऊन टाकावं.' कारण ह्या कोंबड्यांचा मालक इथे आता पहारा करत बसेल अन् आम्हाला पकडून आमचा जीव घेईल. तर अशा वेळी पुनः येथे येण्याच्या भानगडीत पडणं वेडेपणाचं नाही काय ?' आपले मत सांगून तो त्याप्रमाणे वागू लागला.

तरुण कोल्ह्याने इतक्या कोंबड्या खाल्ल्या की, त्याचे पोट फुगून फुटले व तो मरण पावला. म्हातार्‍या कोल्ह्याने एकदोन कोंबड्या खाऊन दुसर्‍या दिवशी पुनः येण्याचे ठरविले. दुसर्‍या दिवशी तो या ठिकाणी आला असता कोंबड्यांच्या मालकाने त्याला पकडले व ठार केले.

तात्पर्य

- तरुण लोक अधाशीपणामुळे तर म्हातारे लोक लोभामुळे दुःख भोगतात.

« PreviousChapter ListNext »