Bookstruck

म्हातारा कुत्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका कुत्र्याने आपल्या तरुणपणी फार जनावरांची शिकार करून आपल्या मालकाचा लोभ संपादन केला होता. त्यावेळी त्याचा मालक त्याला कुरवाळीत असे व चांगले पदार्थ खाऊ घालीत असे. पुढे त्या कुत्र्याला म्हातारपण आले, तेव्हा पूर्वीसारखे शिकारीचे काम त्याच्याकडून होईनासे झाले. अशा अवस्थेत एके दिवशी इतर सगळ्या कुत्र्यांच्या पुढे जाऊन त्याने एका सशाची तंगडी पकडली, परंतु म्हातारपणामुळे त्याच्या तोंडात दात नव्हते, त्यामुळे ससा धरावा तितक्या बळकटपणे धरता आला नाही व तो ओढाताण करून सुटून गेला. ते पाहून त्या मालकास फार राग आला. हातातील काठीने तो त्याला मारू लागला. तेव्हा तो कुत्रा त्याला म्हणाला, 'अरे कृतघ्न माणसा ! क्षणभर थांब आणि तुझी चाकरी मी किती वर्षे इमाने इतबारे केली आहे, याचा विचार कर. ससा धरण्याच्या कामी मी माझ्याकडून काहीही आळस केला नाही. पण माझे दात पडले त्याला माझा काय इलाज ? म्हातारपणामुळे माझ्याकडून काम होत नाही, यामुळे तुला राग येतो, पण जर तू माझ्या पूर्वीच्या चाकरीकडे लक्ष देशील, तर तुझा माझ्यावरचा राग बराच कमी होईल.'

तात्पर्य

- ज्याने तारुण्यात आपली चाकरी इमानाने केली त्या नोकराला त्याच्या म्हातारपणात क्रूरपणे वागविणे हे कृतघ्नतेचे लक्षण आहे.

« PreviousChapter ListNext »