Bookstruck

म्हातारा आणि त्याचे मुलगे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका म्हातार्‍यास पाच मुलगे होते, ते आपापसात नेहमी भांडत असत. त्यांनी भांडू नये म्हणून म्हातार्‍यानं त्यांना रागवून पाहिले, उपदेश करून पाहिला, परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने एक युक्ती योजली; काठ्यांची एक जुडी आणून त्याने आपल्या मुलांना बोलावले, आणि त्यांपैकी प्रत्येकास सांगितले की, 'तुझ्या अंगात जी शक्ती असेल ती सगळी खर्चून ही काठ्यांची जुडी मला मोडून दे.' हे ऐकून त्या पाचही मुलांनी मोठा जोर करून ती मोडण्याचा प्रयत्‍न केला, पण फार काठ्या एकत्र असल्यामुळे एकाही मुलाला ती मोडता आली नाही. नंतर म्हातार्‍याने जुडी सोडून तिच्यातील काठ्या निरनिराळ्या केल्या व त्यातील एकेक काठी प्रत्येक मुलाच्या हाती देऊन ती त्याला मोडायला सांगितली. मुलांनी त्या काठ्या एका क्षणात मोडून टाकल्या. इतके झाल्यावर म्हातारा त्यांना म्हणाला, 'अरे, हे एकीचं सामर्थ्य पाहिलंत ना ? त्या जुडितल्या काठ्याप्रमाणे एकत्र राहून एकमेकाच्या विचाराने तुम्ही वागाल तर तुम्हाला त्रास द्यायला मोठा बलवान शत्रूही धजावणार नाही, या मोडक्या काठ्यांप्रमाणे तुम्ही जर एकमेकांचा आश्रय सोडून निरनिराळे व्हाल, तर एखादा क्षुल्लक माणूसही अल्पप्रयासाने तुमचा नाश करू शकेल !'

तात्पर्य

- फाटाफूट व मतभेद यांच्यामुळे मोठमोठी राज्येही नाश पावली आहेत, हे लक्षात घेऊन निदान एका कुटुंबातल्या माणसांनी तरी विभक्त होण्याच्या भरीस पडू नये हे चांगले.

« PreviousChapter ListNext »