Bookstruck

ससे आणि बेडूक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक मोठे वादळ होऊन सगळी झाडे हालू लागली. जमिनीवर पडलेली पाने वार्‍याने चोहोकडे उडू लागली आणि धुळीने दाही दिशा धुंद होऊन गेल्या. तो प्रकार पाहून एके ठिकाणी काही ससे होते ते घाबरून गेले व कुंपणावरून उड्या मारून पळत सुटले. वाटेत त्यांना एक नदी आडवी आली. तेव्हा मोठ्या दुःखाने ते म्हणूं लागले, 'आता मात्र दुर्दैवाने कमाल केली ! जिकडे जावं तिकडे आपल्यामागे संकटं सारखी उभी आहेत. तर असल्या वाईट स्थितीत राहून जगण्यापेक्षा या नदीत उड्या टाकून जीव द्यावा हे चांगलं.' मग त्याप्रमाणे निश्चय करून ते नदीकाठी गेले. नदीतील काही बेडूक बाहेर येऊन बसले होते. त्यांनी सशांना पाहून भितीने पाण्यात उड्या मारल्या. ते पाहून एक म्हातारा ससा बेडकाकडे बोट दाखवत म्हणाला, 'अरे, हा पहा प्रत्यक्षच पुरावा. यावरून प्रत्येकाच्या मागे काही ना काही तरी भिती लागतीच आहे हे उघड आहे. मग अशा स्थितीत संकटांना भिऊन जीव देण्यापेक्षा धैर्य धरून संकटाला तोंड द्यावं हेच पुरुषार्थाचं नाही काय ? हे त्याचे बोलणे ऐकून ते सगळे ससे मोठ्या धैर्याने तेथेच उभे राहिले व काही वेळाने वादळ शांत झाल्यावर आपल्या राहण्याच्या ठिकाणी निर्भयपणे निघून गेले.

तात्पर्य

- 'धीर सो गंभीर.'

« PreviousChapter ListNext »