Bookstruck

मोर आणि कावळा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा सगळ्या पक्ष्यांनी आपली सभा भरवून कोणत्या पक्ष्याला राजा करावे याविषयी विचार करत असता मोर पुढे झाला. त्याने आपला सोनेरी पिसारा उभारून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. मोराचे सौंदर्य पाहून त्याला राजा करावे असे बहुतेकांना वाटले. आपले पंख उभारून त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली. मोर राजा होणार इतक्यात कावळा पुढे झाला आणि मोराला म्हणाला, 'महाराज, मला एक शंका आहे, आपली आज्ञा असेल तर बोलेन.' मोर म्हणाला, 'भिऊ नकोस, बोल, तुझी शंका स्पष्ट बोलून दाखव.' त्यावर कावळा म्हणाला, 'महाराज, राजा झाल्यावर आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही तुमच्याकडे सोपवितो आहोत, तर आता गरुड, गिधाड, घार किंवा ससाणा यापैकी एखाद्याने आपल्या स्वभावाला अनुसरून जर कदाचित आम्हा गरीबांवर धाड घातली तर त्याचं निवारण आपण कोणत्या साधनाने करणार, याचा खुलासा करून आमच्या मनातली भीती आपण काढू टाकावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे.' हा प्रश्न ऐकताच मोराची खरी किंमत काय हे लक्षात येऊन सगळे पक्षी म्हणाले, 'अहो, ह्या कावळ्याची शंका बरोबर आहे. ह्या नाजूक आणि सुंदर पक्ष्याच्या हातून आपलं रक्षण होणं शक्य नाही. तर ह्याला राज्यपद न देता दुसर्‍या एखाद्या बलवान पक्ष्याला ते द्यावं हेच योग्य ! '

तात्पर्य

- श्रीमंती व सौंदर्य यापेक्षा चातुर्य व शक्ती यांची योग्यता मोठी आहे.

« PreviousChapter ListNext »