Bookstruck

म्हातारी आणि तिची मेंढी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका म्हातारीची एक मेंढी होती. तिची लोकर जितकी जास्त निघेल तितकी काढावी या हेतूने ती अगदी साफ कापून काढण्याचा म्हातारी प्रयत्‍न करीत असे. तसे करताना एखादे वेळी मेंढीच्या अंगाला कात्री लागून तिला बरेच लागत असे. एके दिवशी तसा प्रकार झाला असता, ती मोठ्याने ओरडून म्हणाली, 'अग बाई, तू माझे असे हाल का करतेस ? माझ्या अंगातून रक्त काढल्याने लोकरीत काही भर पडेल का ? तुला जर माझी लोकर हवी असेल तर लोकर कापणार्‍या धनगराला बोलाव म्हणजे माझं रक्त न निघता तो ती कापून देईल अन् जर तुला माझं मांस हवं असेल तर खाटकाला बोलाव, म्हणजे माझे असे हाल न करता तो मला आपल्या सुरीच्या एका घावात ठार मारून टाकेल !'

तात्पर्य

- ज्याला एकाही कामाची पुरी माहिती नाही अशा माणसाकडून कोणतेही काम धडपणे होणे शक्य नाही, पण उलट त्याने काहीतरी नुकसान केले नाही म्हणजे मिळविली म्हणून समजावे.

« PreviousChapter ListNext »